चौकशीत नीरज बिश्नोईचा खुलासा – बुल्ली बाई ऍप प्रकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऍप प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या नीरज बिश्नोईसंबंधी नवे खुलासे झाले आहेत. वयाच्या 15 व्या वर्षांपासून हॅकिंग, वेबसाइट्सना नुकसान पोहोचविण्याचे प्रकार चालविले असल्याचे आरोपीने मान्य केले आहे. भारतासह पाकिस्तानच्या शाळा आणि विद्यापीठांच्या विविध वेबसाइट्स हॅक केल्या असल्याचा दावा त्याने केला आहे.
बुल्ली बाई ऍप प्रकरणी दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. या ऍपचा मुख्य आरोपी नीरजला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आयएफएसओचे उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी नीरजच्या चौकशीविषयीची माहिती दिली आहे.
जपान निर्मित गेमिंग कॅरेक्टर जियू शब्दाचा वापर करत विविध ट्विटर हँडल्स त्याने तयार केले होते. याच्या माध्यमातून त्याने कायदा-अंमलबजावणी यंत्रणांना स्वतःला पकडून दाखविण्याचे आव्हान देखील दिले होते. नीरजला आसाममधून ताब्यात घेण्यात आले होते.
मागील अनेक महिन्यांपासून विशिष्ट धर्माच्या महिलांची छायाचित्रे बुल्ली बाई ऍपवर अपलोड करत आक्षेपार्ह टिप्पणी करणे आणि द्वेष फैलावण्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी बेंगळूरमधील एका इंजिनियरला तसेच उत्तराखंडमधून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये 18 वर्षीय युवतीचा देखील समावेश आहे.