आर्थिक व्यवहारांवर येणार बंधने : दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आव्हान
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्यामुळे ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला ग्रे यादीतच कायम ठेवले आहे. पाकिस्तानने 27 पैकी 26 मुद्दे पूर्ण केले आहेत. मात्र अजूनही एक मुद्दा पूर्ण केला नसल्याने एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे यादीतच ठेवले आहे. पुढील काही दिवस पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर राहणार असल्याचे एफएटीएफचे अध्यक्ष मार्कस प्लेयर यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहारांवर बंधने राहणार आहेत. एफएटीएफच्या ग्रे यादीत असल्याने जागतिक बँक, आयएमएफ आणि युरोपीय संघाकडून आर्थिक मदत मिळणे कठीण होणार आहे. त्याचबरोबर इतर देशांकडून आर्थिक मदत मिळण्यातही अडचणी निर्माण होतील. तसेच दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे धाडस आता इम्रान खान यांना दाखवावे लागणार आहे.
हाफिज सईद, मसूद अजहर यांच्या विरोधात कारवाई करण्यास पाकिस्तान सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे पाकिस्तानला आणखी सहा महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. पाकिस्तानला 2018 सालातील जून महिन्यात ग्रे यादीत टाकण्यात आले होते. दर सहा महिन्यांनी याबाबत आढावा घेतला जात असला तरीही पाकिस्तान सर्व अटींची पूर्तता करू शकलेला नाही. एफएटीएफच्या मागण्या पूर्ण करण्यास पाकिस्तान अपयशी ठरला आहे. साहजिकच पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानला या निर्णयामुळे 38 अरब डॉलर्स नुकसान सहन करावे लागत आहे.