कराची / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन संघ यजमान पाकिस्तानविरुद्ध आजपासून (शनिवार दि. 12) कराचीतील स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळत असून लेगस्पिनर मिशेल स्वेप्सनला ऑस्ट्रेलियन संघातून पदार्पणाची संधी मिळणे अपेक्षित आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 10.30 वाजता सुरुवात होईल.
स्वेप्सनने 5 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन कसोटी संघासमवेत दौरा केला आणि नॅथन लियॉनला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. पण, प्रत्यक्षात अंतिम एकादशमध्ये त्याला स्थान मिळत नव्हते. रावळपिंडीतील पाटा खेळपट्टीवर खेळलेल्या जोश हॅझलवूडला वगळत स्वेप्सनला संघात जागा दिली जाणार आहे. 1998 नंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानमध्ये पहिलीच कसोटी खेळत असताना 14 सत्रांमध्ये केवळ 14 फलंदाज बाद झाले आणि आयसीसीने त्या खेळपट्टीला सुमार दर्जा दिला आहे. दुसऱया कसोटीसाठी कराचीतील खेळपट्टी त्या तुलनेत समतोल असेल, असा होरा आहे.