ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
लाहोरहून कराचीला येणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवासी विमान लँडिंग करताना आज दुपारी कोसळले. कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पाकिस्तान सरकारने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
अपघातग्रस्त विमान पीआयए एअरबस ए ३२० प्रकारातील होते. या विमानात 85 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 97 जण होते. हे विमान लाहोरहून कराचीला येत असताना लँडिंगला केवळ एक मिनिट बाकी असताना हे विमान कोसळले. घटनास्थळी आग लागली असून, चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत. या भागातील काही गाड्यांचेदेखील नुकसान झाले आहे.
घटनास्थळी पाकिस्तानी रेंजर्स आणि पाकिस्तानी लष्करच्या तात्काळ कृती दलाचे जवान दाखल झाले आहेत. विमानातील प्रवाशांसह मॉडेल टाऊन परिसरातील काही लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.