बेल्जियमच्या खासदाराची मागणी
वृत्तसंस्था/ ब्रसेल्स
दहशतवादाला पाकिस्तानकडून मिळणारे खतपाणी कुणापासून लपून राहिलेले नाही. तालिबानला साथ देऊन पाकिस्तानने या गोष्टीला या धारणेला अधिकच बळ दिले आहे. या पार्श्वभूमीवर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची निंदा सुरू झाली आहे. उत्तर युरोपमधील देश बेल्जियममध्ये पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे म्हणत बेल्जियमचे सिनेटर फिलिप डेविन्टर यांनी चिंता व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांना समर्थन देणाऱया पाकिस्तानसोबत बेल्जियमने कुठलेच संबंध ठेवू नयेत. तालिबानप्रमाणेच पाकिस्तान देखील जगासाठी धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान खूप आधीपासून आंतरराष्ट्रीय दहशतवादाला बळ पुरवत आला आहे आणि यापुढेही पुरवत राहणार आहे. याचमुळे जगभरातील देशांनी एकत्र येत पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा. पाकिस्तान पूर्ण युरोपीय क्षेत्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत राहतो असा आरोपही डेविन्टर यांनी केला आहे.
तालिबानला पाक सैन्याची साथ
अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा व्हावा याकरता पाकिस्तानच्या सैन्याने पूर्ण मदत केली आहे. यामुळे जगासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैनिक परतल्याने युरोपमधून सीरियात जाणाऱया धार्मिक कट्टरवाद्यांची संख्या वाढू शकते. यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादाची समस्या अधिक तीव्र होणार असल्याचे ते म्हणाले.
काश्मीरमध्ये तालिबानच्या कारवाया
तालिबानकडे आता पैसे आणि अनुभव दोन्ही आहेत. बेल्जियमच्या सरकारने तालिबानकडे गंभीर धोका म्हणून पहावे असे डेविन्टर यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जानंतर दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पाकिस्तानसह भारतातील काश्मीरमध्ये दहशतवाद वाढू शकतो असे उद्गार युरोपियन फौंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीजचे कार्यकारी संचालक जुनैद कुरैशी यांनी काढले आहेत.