रावळपिंडी / वृत्तसंस्था
यजमान पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून खेळवली जाणार असून पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर सलग तिसऱया मालिकाविजयासाठी प्रयत्नशील असू शकेल. मागील दशकभरात पाकिस्तानला सातत्याने तटस्थ ठिकाणी खेळावे लागले असून त्यानंतर त्यांना घरच्या भूमीत खेळण्याची संधी मिळत आहे. येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्यापेक्षा अव्वल मानांकित संघाला नमवण्याची संधी त्यांच्याकडे असेल.
ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱयावर येणार नाही, असे यापूर्वी जाहीर केले गेले. यामुळे, येथील मालिकेसह आफ्रिकेच्या कसोटी हंगामाची सांगता होईल, हे निश्चित आहे. या हंगामात त्यांना केवळ 4 कसोटी सामनेच खेळता आले.
ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा एक भाग आहे. मात्र, यातील निकालाने गुणतालिकेत फारसा काहीच बदल होणे अपेक्षित नाही. सध्या यात पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी तर दक्षिण आफ्रिकन संघ सहाव्या स्थानी आहे.
दक्षिण आफ्रिकेला सध्या विविध खेळाडूंच्या दुखापतींनी बरेच त्रस्त केले आहे. यापूर्वी कराची कसोटीत खेळू न शकलेला तबरेझ शमसी पाठदुखीतून सावरला आहे. पण, अद्याप त्याचा सहभाग निश्चित झालेला नाही. केशव महाराजला दोनच दिवसांपूर्वी चेंडू लागल्यानंतर वेदना जाणवल्या. येथे तो खेळू शकला नाही तर जॉर्ज लिंडेला संधी मिळू शकते.
संभाव्य संघ
पाकिस्तान ः इम्रान बट, अबिद अली, अझहर अली, बाबर आझम (कर्णधार), फवाद आलम, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, हसन अली, नौमन अली, यासीर शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
दक्षिण आफ्रिका ः डीन एल्गार, एडन मार्करम, रॉस्सी व्हान डर डय़ुसेन, फॅफ डय़ू प्लेसिस, क्विन्टॉन डी कॉक (कर्णधार, यष्टीरक्षक), तेम्बा बवूमा, वियान मुल्डर, केशव महाराज/जॉर्ज लिंडे, कॅगिसो रबाडा, तबरेझ शामसी/लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः सकाळी 10.30 पासून.