ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानमधील विपक्ष पार्टी पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे 32 वर्षीय अध्यक्ष आणि देशाच्या दोन वेळा पंतप्रधान झालेल्या बेनजीर भुट्टो यांचा मुलगा बिलावल भुट्टो यांनी सांगितले की, सध्या मी आयसोलेटमध्ये आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या मी आयसोलेटमध्ये आहे. माझ्यामध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे आहेत. सध्या मी घरातूनच काम चालू ठेवणार आहे. तसेच व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून पीपीपीच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम संबोधित करणार आहे.
दरम्यान, मागील 24 तासात पाकिस्तानमध्ये 3,306 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण आकडा 3,86,198 वर पोहोचला आहे. तर 7,843 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यासोबतच 43, 963 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.