वृत्तसंस्था/ ढाका
विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने, पाकिस्तान जगातील सर्वात सुरक्षित स्थळापैकी एक असल्याचे प्रतिपादन करून पाकचे समर्थन केले आहे. पाकिस्तान सुमारे दशकभराच्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेट खेळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.
2009 मध्ये पाक दौऱयावर असताना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमजवळ लंका संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात लंकेचे काही खेळाडू जखमी झाले होते. या घटनेनंतर क्रिकेट खेळणाऱया सर्व देशांनी पाक दौरा करण्यास नकार दिला होता. मात्र गेल्या महिन्यात लंकन संघाने या देशाचा दौरा करून पाकमध्ये कसोटी क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्यास मदत केली. सध्या बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या प्रिमियर लीगमध्ये खेळत असेलल्या विंडीजच्या ख्रिस गेलला, क्रिकेटसाठी पाकिस्तान सुरक्षित आहे का, असे विचारले असता त्याने वरील प्रतिपादन केले. ‘पाकिस्तान हे सध्या जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक आहे. पाकमध्ये विदेशी खेळाडूंना अध्यक्षीय सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. त्यामुळे तेथे खेळाडू सुरक्षित हातात असतात. तीच स्थिती बांगलादेशमध्येही आहे. तेथेही आम्ही सुरक्षित हातात आहोत. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही,’ असे गेल म्हणाला.
गेल सध्या बीपीएलमध्ये छत्तोग्राम चॅलेंजर्सकडून खेळत आहे. लंकेचा पाक दौरा सुरळीतपणे पार पाडल्यानंतर पाकला इतर देशही पाक दौरा करतील, अशी आशा वाटत आहे. याच आशेवर त्यांनी बांगलादेशला 3 टी-20 व दोन कसोटी खेळण्यासाठी निमंत्रित केले आहे. मात्र बीसीबीने त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. त्यापैकी बांगलादेशने या मालिकेतील अर्धे सामने बांगलादेशमध्येच खेळण्याचा प्रस्ताव पाकसमोर ठेवला होता. पण पाकने त्याला साफ नकार दिला आहे.