वृत्तसंस्था /इस्लामाबाद
सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ पाकच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर उभय संघात वनडे मालिका आयोजित केली आहे. सुरुवातीला ही वनडे मालिका रावळपिंडीमध्ये निश्चित केली होती. पण आता काही राजकीय कारणांमुळे या मालिकेच्या ठिकाणात बदल करण्यात आला असून आता ती लाहोरमध्ये खेळविली जाणार आहे. पाक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि त्यानंतर एकमेव टी-20 सामना खेळविला जाणार आहे. ही वनडे मालिका चालू महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. सदर मालिका रावळपिंडीमध्ये निश्चित केली होती. पण अनेक राजकीय रॅलीज निघणार असल्याने वाहतूक कोंडी, सुरक्षेची समस्या येणार असल्यामुळे ही मालिका रावळपिंडीऐवजी लाहोरमध्ये खेळविण्याचा निर्णय पाकच्या सुरक्षा विभागाच्या मंत्र्यांनी घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेला पाकमध्ये शौकिनांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. पाकच्या राजधानीमध्ये राजकीय हालचाली अधिक होत असल्याने दोन्ही संघांच्या सुरक्षेच्या कारणावरून ही आगामी वनडे मालिका लाहोरमध्ये आयोजित केली आहे. सध्या पाकच्या दौऱयावर असलेला ऑस्ट्रेलियन संघ 6 एप्रिलला मायदेशी परतणार आहे. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना लाहोरमध्ये येत्या सोमवारपासून खेळविला जात आहे.