वृत्तसंस्था/ लाहोर
येत्या डिसेंबरमध्ये इंग्लंड विरुद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सोमवारी पीसीबीने 18 सदस्यांचा संघ जाहीर केला असून फिरकी गोलंदाज अब्रार अहमद आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद अली या दोन नव्या चेहऱयांना संधी दिली आहे. मात्र, फवाद आलम, हसन अली, यासीर शहा, शाहीन आफ्रिदी यांना वगळण्यात आले आहे.
2005 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ पाकच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी येत आहे. या मालिकेतील पहिली कसोटी रावळपिंडी तर दुसरी कसोटी कराची आणि तिसरी कसोटी मुल्तान येथे होणार आहे. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीवर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नाही. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा अंतर्गत ही मालिका असल्याने पाकला तसेच इंग्लंडलाही तितकीच महत्त्वाची आहे. आयसीसीच्या कसोटी मानांकनात पाकचा संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. पाकच्या कसोटी संघामध्ये 24 वषीय फिरकी गोलंदाज अब्रार अहमदला निवड समितीने संधी दिली आहे. पाकमध्ये सुरू असलेल्या कैद-ए-आझम चषक क्रिकेट स्पर्धेत त्याने 21.95 धावांच्या सरासरीने 43 गडी बाद केल्याने त्याला या आगामी मालिकेसाठी निवडण्यात आले आहे. मध्य पंजाबमधील वेगवान गोलंदाज मोहम्मद अली यालाही या मालिकेत संधी देण्यात आली आहे. मोहम्मद अलीने कैद-ए-आझम चषक क्रिकेट स्पर्धेतील गेल्या दोन हंगामात 56 बळी घेत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. मोहम्मद वासीम ज्युनियर आणि झहीद मेहमूद यांचाही या संघात समावेश असून या दोन्ही खेळाडूंनी अद्याप आपले कसोटी पदार्पण केलेले नाही. यापूर्वी पाक आणि लंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती.