वृत्तसंस्था/ गयाना
पाकचा क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱयावर आहे. या दौऱयात उभय संघामध्ये टी-20 मालिका खेळविली जात आहे. येथे शुक्रवारी सरावावेळी पाकचा फलंदाज आझम खान याच्या डोक्यावर चेंडू आदळल्याने त्याला तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले.
22 वर्षीय आझम खानने चालू महिन्याच्या प्रारंभी इंग्लंडविरूद्ध आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते. सरावावेळी फलंदाजी करताना गोलंदाजाकडून टाकलेला वेगवान चेंडू आझम खान डोक्यावर आदळला. आझम खानच्या या दुखापतीचे स्वरूप निश्चित समजलेले नाही पण डॉक्टरांचे पथक त्याच्यावर वैद्यकीय इलाज करीत असून 24 तासांच्या कालावधीसाठी त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या दुखापतीमुळे तो आता टी-20 मालिकेतील दुसऱया आणि तिसऱया सामन्यात खेळू शकणार नाही. या टी-20 मालिकेनंतर पाक आणि विंडीज यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेला 12 ऑगस्टपासून प्रारंभ होईल.