वृत्तसंस्था/ लाहोर
दक्षिण आफ्रिकेचे मिकी आर्थर यांची पाक क्रिकेट संघाच्या संचालकपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पीसीबी आणि आर्थर यांच्यातील कराराच्या अटी जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे समजते. मिकी आर्थर यापूर्वी पाक क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते.
आता पीसीबीने प्रमुख प्रशिक्षकपदाच्या जबाबदारी ऐवजी संघ संचालकपदाची जबाबदारी आर्थर यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पाक संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी यापूर्वी सक्लेन मुश्ताककडे सोपवण्यात आली होती पण सक्लेनने आपल्या पदाचा त्याग केल्याने पीसीबीने सक्लेनच्या उत्तराधिकाऱयाच्या शोधमोहिमेला प्रारंभ केला आहे. गेल्या तीन आठवडय़ापासून पीसीबी नव्या प्रशिक्षक पदाच्या शोधात आहे.
अलीकडेच पीसीबी आणि दक्षिण आफ्रिकेचे मिकी आर्थर यांच्यात या नव्या करारातील अटी संदर्भात चर्चा झाली आहे. पीसीबीच्या सर्व अटी आर्थर यांनी मान्य केल्या असल्याचे समजते. पण आर्थर या नव्या करारानुसार पाक संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहणार नाहीत तर ते संघाचे संचालक म्हणून कार्यरत राहतील. इंग्लिंड कौंटी क्रिकेट स्पर्धेत सहभागी असलेल्या डर्बिशायर क्लबबरोबर आर्थर यांनी दीर्घ मुदतीचा करार झाला होता. आर्थर हा करार रद्द करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजते. पीसीबीचे नवे चेअरमन नजम सेठी यांनी गेल्या आठवडय़ात आर्थर यांच्यासमवेत या नव्या करारासंदर्भात चर्चा केली होती. उभयतांमधील हा करार लवकरच अंतिम केला जाईल, अशी आशा पीसीबीने व्यक्त केली आहे. 1 एप्रिलपासून आर्थर पाक संघाचे संचालक म्हणून कार्यरत होतील, अशी माहिती पीसीबीच्या सूत्राने दिली आहे.
मिकी आर्थर आणि पीसीबी यांच्यातील हा करार झाला तर पाक क्रिकेट संघाला आर्थर हे प्रमुख प्रशिक्षक ऐवजी क्रिकेट सल्लागार म्हणून लाभतील. दरम्यान संघाच्या प्रत्येक दौऱयावेळी आर्थर यांना संघाबरोबर जाण्याची आवश्यकता नसल्याचे पीसीबीने म्हटले आहे. पाकचा क्रिकेट संघ जुलै महिन्यात लंकेच्या दौऱयावर जाणार आहे. तसेच त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आशिया चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या दोन्ही दौऱयामध्ये आर्थर कदाचित पाक संघाबरोबर राहणार नाहीत कारण येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होणार असून आर्थर यांनी या स्पर्धेला अधिक प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. 2016 ते 2019 या कालावधीत मिकी आर्थर हे पाक क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत पाक संघाची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली होती. 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकने जिंकली होती. 2016 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक संघाची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यानंतर आर्थर यांच्या मार्गदर्शनाखाली पाक संघाने विविध स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखत आयसीसीच्या मानांकनात वरचे स्थान मिळवले होते.