वृत्तसंस्था/ कराची
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पाकमध्ये होणाऱया आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पीसीबीने शुक्रवारी 20 जणांचा संघ घोषित केला. या संघामध्ये शान मसूद आणि हॅरिस सोहेलसह अन्य सहा खेळाडूंना त्यांनी डच्चू दिला आहे. पाक निवड समितीचे नवे प्रमुख मोहम्मद वासीम यांनी या आगामी मालिकेसाठी इमाम उल हकलाही डच्चू दिला आहे.
या आगामी मालिकेसाठी पाक संघामध्ये नवोदित नऊ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये सलामीचा फलंदाज सौद शकील, कामरान गुलाम, अष्टपैलू आगा सलमान, डावखुरा फिरकी गोलंदाज नोमन अली, फिरकी गोलंदाज साजिद खान, वेगवान गोलंदाज हसन अली आणि तबिश खान या सर्व नवोदित खेळाडूंना पाकच्या निवड समितीने संधी दिली आहे. उभय संघातील पहिली कसोटी 26 जानेवारीपासून येथील नॅशनल स्टेडियमवर सुरू होणार आहे. हॅरिस रौफचे संघात पुनरागमन झाले आहे. यापूर्वी न्यूझीलंड दौऱयावर गेलेल्या पाक संघातील सहा खेळाडूंना वगळले आहे. दुखापतीमुळे नसीम शहाला या मालिकेसाठी निवडण्यात आले नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ शनिवारी कराचीमध्ये दाखल होईल.
पाक कसोटी संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, इम्रान बट, अब्दुल्ला शफीक, अबिद अली, अझहर अली, फवाद आलम, सर्फराज अहमद, सौद शकील, कामरान गुलाम, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, तबिश खान, हॅरिस रौफ, साजिद खान, नौमन अली, यासीर शहा, फहिम अश्रफ, मोहम्मद नवाज.