वृत्त संस्था/ लाहोर
पुढील महिन्यात होणाऱया दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी रविवारी पाक संघाची घोषणा करण्यात आली. सध्या फॉर्ममध्ये असलेला मोहम्मद हाफीज आणि सलामीचा फक्र झमानला संघातून वगळण्यात आले आहे.
40 वर्षीय मोहम्मद हाफीजच्या फलंदाजीत सातत्य दिसत असून त्याने गेल्या 12 टी-20 सामन्यात 100.40 धावांच्या सरासरीने 502 धावा जमविल्या आहेत. पण त्याला या आगामी टी-20 मालिकेसाठी वगळून पाकच्या निवड समितीने धक्का दिला आहे. तसेच सूर मिळविण्यासाठी झगडत असलेल्या फक्र झमानलाही निवड समितीने डच्चू दिला आहे. या संदर्भात मोहम्मद हाफीजकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होवू शकली नाही. मोहम्मद हाफीज सध्या अबु धाबीत सुरू असलेल्या टी-10 लीग स्पर्धेत खेळत असून ही स्पर्धा 6 फेब्रुवारीला संपणार आहे. पाक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका लाहोरमध्ये 11, 13 आणि 14 फेब्ा्रgवारीला खेळविली जाणार आहे. सध्या पाकमध्ये कसोटी मालिका सुरू असून यजमान पाकने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आघाडी मिळविली आहे. आता उभय संघातील दुसरी आणि शेवटची कसोटी रावळपिंडीत गुरूवारी सुरू होईल.
पाक संघ- बाबर आझम (कर्णधार), हैदर अली, खुशदील शहा, हुसेन तलत, दानीश अझीझ, असिफ अली, इफ्तिकार अहमद, मोहम्मद नवाज, झाफर गोहर, फईम अश्रफ, अमीर यामीन, अमाद बट्ट, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, शाहीन अफ्रिदी, हॅरीस रॉफ, मोहम्मद हुसेन, हसन अली, उस्मान कादीर आणि झहीद मेहमूद.