ऑनलाईन टीम / पेशावर :
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांचे जन्मस्थान असलेली पाकिस्तानमधील वंशपरंपरागत घरे इम्रान खान सरकार खरेदी करणार आहे.
राज कपूर आणि दिलीप कुमार या अभिनेत्यांचा जन्म पाकिस्तानातील आहे. पेशावर शहरात मध्यवर्ती भागात या ज्येष्ठ अभिनेत्यांच्या वंशपरंपरागत इमारती आहेत. या इमारती 100 वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या आता जीर्ण झाल्या असून, मोडकळीस आल्या आहेत. त्या इमारती कोसळण्यापूर्वी त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांताच्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे या इमारती पाकिस्तान सरकार खरेदी करणार आहे.
या दोन्ही अभिनेत्यांच्या इमारती राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. इमारतींच्या संवर्धनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय खैबर पख्तुनवा प्रांतातील पुरातत्व विभागाने घेतल्याचे या विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुस समाद खान यांनी सांगितले.