प्रतिनिधी / वाई
पाचगणी येथे परदेशी नागरिक कायदा उल्लंघन प्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. इथोपिया देशाचे नागरिक अब्देला महंमद गाल व ओमर महंमद गाल हे दोन परदेशी नागरिक त्यांच्या व्हीसाची मुदत संपलेली असताना विना परवाना पाचगणी येथे वास्तव्यास राहिले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधितांनी व्हीसाची मुदतवाढ करून घेणे गरजेचे असतानाही त्यांनी तसे केले नाही. वैध व्हीसा नसताना विना परवाना पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील डिसोझा एज्युकेशन ट्रस्ट ठिकाणी १५ ऑगस्ट २०२० ते १५ जानेवारी २०२१ असे पाच महिने वास्तव्य केले म्हणून संबंधित परदेशी नागरिकांवर परदेशी नागरिक कायदा उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद कॉन्सटेबल वैभव शामराव भिलारे यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कदम आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.