वार्ताहर / पाचगाव
पाचगाव परिसरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. परिसरात डेंगूची साथ पसरण्याचा धोका आहे. असे असताना ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.
पाचगाव, आर के नगर परिसरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या परिसरातील अनेक रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत . पाचगाव ,आर के नगर परिसरात अनेक ठिकाणी कचरा उघड्यावरच कुजत आहे. गटर तुंबलेले आहेत .अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गेल्या कित्येक महिन्यात डास नाशक धुराची फवारणी केलेली नाही. जंतुनाशक पावडरची फवारणी वर्षभरात केवळ एकदाच ग्रामपंचायतीने केली आहे.
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. डेंग्यूच्या साथीमुळे आणि सध्या सुरू असणाऱ्या कोरोनामुळे ताप आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. पाचगाव ग्रामस्थ कोरोनामधून थोडे सावरत असतानाच परिसरात डेंग्यूने डोके वर काढले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सुमारे 40 हजार लोकसंख्या असणाऱ्या पाचगाव मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.