वार्ताहर/ पाचवड
पाचवड-वाई रस्त्यावरील बाजारपेठेमधील राहत्या घरात चोरटय़ाने डल्ला मारुन सुमारे 10 तोळे सोने व 43 हजार रुपयांची रोकड अशी सुमारे साडेचार लाख रुपयांची चोरीची घटना घडली आहे. सदर चोरी गुरुवार दि. 23 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान सदरची घटना ही पाचवडमधील आजपर्यंतची सर्वात मोठा ऐवज चोरीची घटना असल्याने पाचवडवासीया बरोबरच परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाचवड येथील मटण मार्केटच्या पाठीमागील बाजूस राहते घर बंद अवस्थेत होते. या घरामधील सर्वजण एका घरगुती कार्यक्रमानिमित्त म्हसवे, तालुका जावली या ठिकाणी गेले होते. याचा फायदा घेत सदर बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी घरामधील असणारे सुमारे 10 तोळे सोने व 43 हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सदर घरातील कुटुंबिय शुक्रवार दि.24 रोजी पाचवड येथे आल्यानंतर सदरची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती समजताच भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि. श्याम बुवा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच श्वानपथकास पाचारण करून चोरटय़ांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे