शाळांची नवीन संरचना निश्चित : जिल्हय़ातील 124 माध्यमिक शाळांचा वर्ग होणार कमी
- शिक्षकांचे होणार अन्यत्र समायोजन
प्रतिनिधी / ओरोस:
माध्यमिक शाळांतील पाचवीचा वर्ग नजीकच्या प्राथमिक शाळांना जोडण्याची कार्यवाही शासनाने सुरू केली आहे. हे वर्ग समायोजित करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून यापुढे पाचवीच्या वर्गात नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे आदेश खासगी अनुदानित माध्यमिक शाळांना देण्यात आले आहेत. दरम्यान या निर्णयामुळे जिल्हय़ातील 124 शाळांतील पाचवीचे वर्ग बंद होणार आहेत. तर या वर्गाच्या शिक्षकांचे अन्यत्र समायोजन होणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायद्यातील तरतुदीनुसार प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशी शाळांची नवीन संरचना निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांचे पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी व दहावी असे गट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या गटानुसार शाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत अनेक माध्यमिक शाळांमधून इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू आहे. हा वर्ग नवीन संरचनेत प्राथमिक स्तरात येतो. त्यामुळे तो एक कि. मी. परिसरात असणे आवश्यक आहे. मात्र माध्यमिक शाळांच्या निकषानुसार त्या तीन कि. मी. अंतरावर असल्याने विद्यार्थ्यांना घरापासून लांब असणाऱया शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमधील पाचवीपासूनचे वर्ग असलेल्या माध्यमिक शाळांमधील पाचवीचा वर्ग स्थानिक अथवा नागरी स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये किंवा खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये जोडला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जवळ असणाऱया शाळेत प्रवेश घेता येणार आहे. जोडण्यात येणाऱया वर्गासाठी वर्गखोली उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था करून देण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्था शाळा प्रशासनांना देण्यात आले आहेत.
या वर्गावरील कार्यरत शिक्षकांचे समायोजन प्राधान्याने त्याच संस्थेंतर्गत सुरू असलेल्या इतर अनुदानित शाळेत करण्यात यावे. अथवा अन्य खासगी अनुदानित संस्थेमध्ये समायोजन करण्यात यावे किंवा स्थनिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून करण्यात यावे. मात्र शासनावर आर्थिक बोजा पडणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हय़ात खासगी अनुदानित 195 शाळा असून यापैकी 126 शाळांमध्ये पाचवीचा वर्ग कार्यरत आहे. या 126 पैकी दोन संस्थांमध्ये पहिलीपासूनचे वर्ग असल्याने त्याच शाळेला हा वर्ग जोडला जाणार आहे. तर उर्वरित 124 शाळांमधील वर्ग नजीकच्या प्राथमिक शाळांना जोडला जाणार आहे.