दुपारी प्रसिध्दीपत्रक, सायंकाळी निकाल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक अर्थात पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचा खेळखंडोबा याहीवर्षी सुरुच आहे. या परीक्षेचा अंतरीम निकाल शुक्रवारी सायंकाळी 6 वा जाहीर झाला. मात्र पुरेशी पूर्वसूचना न देताच जाहीर झालेला हा निकाल मिळवताना विद्यार्थी, पालकांसह शाळांच्याही नाकीनऊ आले आहेत. संबंधित संकेतस्थळवरून हे निकाल प्राप्तच होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत.
16 फेबुवारी रोजी पार पडलेल्या इयत्ता पाचवी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षांचे अंतरिम निकाल शुक्रवारी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार असल्याचे पत्रक त्याचदिवशी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी परीक्षा परिषदेने पुण्यात जारी केल़े आधीच या परीक्षांचे निकाल लावण्यास परीक्षा परिषदेने खूपच विलंब केल्याने नाराजी व्यक्त होत होती. मात्र ‘कोविड’चे कारण पुढे करून वेळ मारून नेली जात होती. शुक्रवार 9 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दपत्रक त्याचदिवशी जाहीर करण्यात आल़े. त्यामुळे अनेकांना या निकालाबाबत माहितीच नव्हती. सायंकाळी उशिरा सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट्समुळे काही लोकांना याची माहिती मिळाली. मात्र परिषदेचे संकेतस्थळ ‘थंड-गार’ पडल्याने शनिवार सायंकाळ झाली तरी प्रत्यक्षात अनेकांना हे निकाल पाहताच न आल्याच्या तक्रारी आहेत.
परीक्षा परिषदेने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार अंतरिम निकालाबाबत गुणपडताळणीसाठी त्या-त्या शाळांच्या लॉगिनवर ऑनलाईन आवेदनपत्र व निकाल उपलब्ध आहे. मात्र तासन्तास वाट पाहूनही शाळां लॉग-ईन होऊ शकत नसल्याचे निर्दशनास आले. त्यातच घरी निकाल उपलब्ध होत नसल्याने पालकांनी शाळेशी संपर्क साधून आपल्या मुलांच्या निकालाची चौकशी सुरु केली. या चौकशीला तोंड देतानाही शाळांना कसरत करावी लागली. या प्रकारांमुळे परीक्षा परिषदेच्या कारभारावर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आह़े
10 वी 12 वी बोर्डाच्या लाखो विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाईन पध्दतीने जाहीर होतात व ते सहज उपलब्ध होतात़ मात्र शिष्यवृती परीक्षेच्या निकालाचा खेळखंडोबा का होतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोविडमुळे बदललेल्या मानसिकतेत नव्याने मनस्तापाला समोर जाण्याची वेळ आल्याबद्दल या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.