कोल्हापूर/प्रतिनिधी
येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या शुभंकराचे अनावरण करण्यात आले. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते आज, मंगळवारी (दि.4) प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर विद्यालयात झालेल्या महानगरपालिकेतील शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीत या शुभंकराचे अनावरण करण्यात आले. कागदाचे विमान उडविणार्या मुलीचे छायाचित्र हे यावेळच्या बालचित्रपट महोत्सवाचा शुभंकर आहे. यावेळी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या समन्वयक उषा सरदेसाई, खांडेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्यामला पवार, विमल जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या चित्रपटाच्या जाणिवा विकसित व्हाव्यात, या हेतूने आठ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी शाहू स्मारक भवन येथे विनामूल्य बालचित्रपट चित्रपट दाखविले जातात. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे ही चळवळ प्रथमच जिल्ह्याबाहेर विस्तारली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सलग दोन दिवस शाहू स्मारक भवन येथे रंगणाऱ्या या महोत्सवात जगभरातील दहा उत्तम चित्रपट या विद्यार्थ्यांना मोफत दाखविण्यात येणार आहेत.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे मिलिंद कोपार्डेकर यांनी चिल्लर पार्टीची संकल्पना सांगितली, तर बालचित्रपट महोत्सवाचे समन्वयक मिलिंद नाईक यांनी या महोत्सवाबद्दल माहिती दिली.महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी यावेळी चिल्लर पार्टीच्या कामाचे कौतुक करुन आशयघन चित्रपटांमुळे मुलांच्या ज्ञानाचे भांडार वाढेल असे सांगितले.
यावेळी सर्व शाळांमधील विद्यार्थी कागदाचे विमान तयार करणार असून सर्व कागदी विमानाचे प्रदर्शन चिल्लर पार्टीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा कागद चिल्लर पार्टीने उपलब्ध करुन दिला.या बैठकीत महानगरपालिकेतील शाळांचे विद्यार्थी सहभागी करण्याबाबत केलेल्या आवाहनाला सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी ३५ हून अधिक शाळांचे मुख्याध्यापक आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिक्षक नेते सुधाकर सावंत यांनी केले तर अभय बकरे यांनी आभार मानले. यावेळी शिवप्रभा लाड, सलीम महालकरी, चंद्रशेखर तुदीगाल, ओंकार कांबळे, गुलाबराव देशमुख आदी उपस्थित होते.