लोणंद / वार्ताहर :
पाच कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपींना तिरकवाडी ता फलटण येथून लोणंद पोलिसांनी जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी 2021 रोजी डोंबाळवाडी ता.फलटण गावच्या हद्दीतील सुळवस्तीवरील कॅनॉलच्या पुलावरुन अविनाश शामराव सोनवलकर रा. डोंबाळवाडी याचे अपहरण करुन पाच कोटीची खंडणी आरोपींनी मागितली होती. लोणंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. यातील अपहरण झालेल्या व्यक्तीची लोणंद पोलीसांनी त्याच दिवशी फलटण येथून संशयित आरोपी सुनिल लक्ष्मण दडस रा. दुधेबाबी ता. फलटण याच्या फ्लॅटमधून सुटका केली होती. मात्र, या प्रकरणातील आरोपी फरार झाले होते.
या आरोपींनी अशाच प्रकारे बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीत पाच कोटींच्या खंडणीकरीता एका इसमाचे अपहरण केले होते. यातील आरोपी फरार होते. आरोपींच्या मागावर लोणंद पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची टिमहोती. लोणंद पोलीस ठाणेकडील खंडणीच्या गुन्हयातील फरार संशयित आरोपी प्रविण ऊर्फ सोन्या नवनाथ गुरव रा. तिरकवाडी ता.फलटण व बारामती शहर पोलीस ठाणेकडील खंडणीच्या गुन्हयातील फरार संशयित आरोपी विशाल दिनकर नरवडे रा. नऱ्हे जि.पुणे हे तिरकवाडी ता. फलटण येथे असल्याची माहीती लोणंद पोलीस ठाणेचे सपोनि विशाल वायकर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ तिरकवाडी ता. फलटण येथे सापळा रचून शिताफिने दोन्ही फरार आरोपींना ताब्यात घेतले.