साके येथील चार तर दिंडनेर्ली येथील एकाचा समावेश
कागल / प्रतिनिधी
कागल तालुक्यातील साके आणि करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथील पाच जणांच्या विरोधात खासगी सावकारी प्रकरणी कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सावकारी कायदा कलम ४५ अंतर्गत आज हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सुनिल सखाराम पाटील याला चौकशी करिता ताब्यात घेतले आहे. सुनिल सखाराम पाटील, सुरेश अशोक बाचणकर, यशवंत जयसिंग वाईंगडे, पवन पांडुरंग आगलावे (सर्व रा.साके, ता.कागल), तानाजी एक्कल ( रा. दिंडनेर्ली ता.करवीर ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भा.द.वि.स. कलम – 384, 386, 420, 452, 504, 506, महाराष्ट्र सावकारी कायदा कलम 45 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबतची फिर्यादी ऋत्वीक बाजीराव चौगले ( वय १९, रा.चौगले गल्ली, साके ता.कागल) यांनी दिली.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार माहे मार्च २०२० ते ता.३ एप्रिल २०२१ या काळात साके ( ता. कागल) येथील खाजगी सावकार सुनिल सखाराम पाटील याने गरजेपोटी दिलेल्या ३ लाख रुपयाचे दोन लाख रुपये व्याजाच्या स्वरुपात ऋत्वीक चौगले यांच्याकडुन जादा पैसे घेतले. तसेच एक लाख रुपये उर्वरीत जादा व्याज देणेबाबत वारंवार तगादा लावला. तसेच ऋत्वीक चौगले यांचे वडीलांचे नावे असलेली साके गावामधील जमीन गट नं. ३४७ मधील साडे तेरा गुंठे जमिनीची नोटरी करतो असे सांगुन फिर्यादीस फसवुन सदरची जमीन विश्वासघाताने स्वत:चे नावावर करून घेतली. तसेच सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नोंदविले. त्याबाबत १५ एप्रिल २o२१ रोजी सायंकाळी ऋत्वीक चौगले हे आरोपीस विचारणा करणेस गेले असता सुनिल पाटील याने वडीलांना व आईला शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली.