आयएसएलमध्ये खेळण्यासाठी सवलत मिळवावी लागणार, शुक्रवारपासून स्पर्धेस प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन सुपर लीगमध्ये सहभागी होणाऱया पाच क्लब्सना एएफसी व राष्ट्रीय परवाना मिळविण्याचे निकष पूर्ण करता न आल्याने त्यांना आता या निर्णयाविरुद्ध दाद मागावी लागेल किंवा एआयएफएफकडून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सवलत मिळवावी लागणार आहे. येत्या शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या मोसमात एएफसी व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी एआयएफएफने पाच क्लब्सना परवाना दिलेला नाही. त्यात ओडिशा एफसी, नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी, केरळा ब्लास्टर्स, हैदराबाद एफसी, नव्याने प्रवेश मिळविलेला ईस्ट बंगाल या क्लब्सचा समावेश आहे. एफसी गोवा, एटीके मोहन बगान, बेंगळूर एफसी, जमशेदपूर एफसी, चेन्नयीन एफसी, मुंबई सिटी एफसी यांनी 2020-21 या मोसमात एएफसी व राष्ट्रीय स्पर्धांत खेळण्याचा परवाना मिळविलेला आहे. ज्या पाच क्लब्सना परवाना मिळविण्यात अपयश आले आहे, त्यांना एआयएफएफच्या क्लब लायसेन्सिंग अपील्स बॉडीकडे क्लब लायसेन्सिंग कमिटीच्या या निर्णयाविरुद्ध ठरावीक मुदतीत दाद मागता येणार आहे. किंवा त्यांना क्लब लायसेन्सिंग कमिटीकडून परवाना नसतानाही खेळण्याची सवलत मिळवावी लागणार आहे.
‘या पाच क्लब्सना आयएसएलमध्ये भाग घ्यावयाचा असेल तर त्यांना या निर्णयाविरुद्ध अपील करावे लागेल किंवा सवलत मिळवावी लागेल,’ असे एआयएफएफ लीग्सचे सीईओ सुनंदो धर यांनी सांगितले. एएफसीचा परवाना न मिळालेला कोणताही क्लब आशिया खंडात होणाऱया एएफसी चॅम्पियन्स लीग आणि एएफसी कप स्पर्धेत, आयएसएलमधून पात्र ठरले असले तरी सहभागी होऊ शकणार नाहीत. दरवर्षी काही क्लब्स परवाना मिळविण्यात अपयशी ठरतात. पण ते सवलत मिळवून सहभागी हेताना दिसतात. एकूण 19 क्लब्सनी राष्ट्रीय व एएफसी क्लब परवान्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी आठ क्लब्स आयलीगमधील आहेत. आयलीगमधील या आठ क्लब्सना परवाना देण्याबाबत एआयएफएफ लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.
परवाना मिळविण्यासाठी प्रत्येक क्लबला पाच प्रमुख निकष पूर्ण करावे लागतात. क्रीडा, पायाभूत सुविधा, प्रशासन, कायदा आणि आर्थिक या संदर्भातील निकष पूर्ण करावे लागतात. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने या निकषामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला असून परवाना मिळविण्याच्या अंतिम मुदतीतही विनंतीवरून वाढ केली आहे. त्यामुळे अनेक निकष वगळण्यात आले आहेत. शुक्रवारी सुरू होणाऱया या स्पर्धेतील पहिला सामना एटीके मोहन बगान व केरळा ब्लास्टर्स यांच्यात होणार आहे. बांबोळी गोव्यातील जीएमसी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. यावर्षीची आयएसएलमधील सर्व सामने गोव्यातील तीन मैदानावर खेळविले जाणार असून सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.