भारतीय लष्कराचा ऐतिहासिक निर्णय – 26 वर्षांच्या उत्कृष्ट सेवेचा गौरव
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय लष्करात 26 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्यांनी 26 वर्षांची उत्कृष्ट सेवा पूर्ण केल्यानंतर भारतीय लष्कराच्या निवड मंडळाने यासंबंधीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एकाचवेळी पाच महिला अधिकाऱ्यांना अशाप्रकारे बढती देण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच दिलेल्या निर्णयाला अनुसरून हा बढतीचा निर्णय देण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या विविध शाखांमध्ये पदोन्नतीचे मार्ग विस्तारणे हे महिला अधिकाऱ्यांसाठी वाढत्या करिअरच्या संधींचे संकेत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
कर्नल (टाइम स्केल) पदावर पाच महिला अधिकाऱयांच्या पदोन्नतीचा मार्ग त्यांच्या सेवा कालावधीनुसार घेतल्याचे भारतीय लष्कराने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पहिल्यांदाच कॉर्प्स ऑफ सिग्नल, कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) आणि कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर मान्यता देण्यात आली आहे.
कर्नलच्या टाइम स्केल रँकसाठी निवडलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांमध्ये कॉर्प्स ऑफ सिग्नलच्या लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कॉर्प्सच्या लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समधून लेफ्टनंट कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांचा समावेश आहे.
भारतीय लष्कराच्या बहुतांश शाखांमधून महिला अधिकाऱयांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या निर्णयामुळे, हे पाऊल भारतीय लष्कराच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आर्मी मेडिकल कॉर्प्स (एएमसी), जज ऍडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कॉर्प्स (एईसी) सारख्या शाखांव्यतिरिक्त अन्य विभागात सेवा बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती देण्याची ही पहिलीच वेळ आहे.