नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना आणि ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चाचपणी सुरु केली आहे. या निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. आज सोमवारी आयोगाची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीत यासंबंधी धोरण निश्चित करण्यात येण्याची शक्यता आहे.
सोमवारच्या बैठकीत तिन्ही निवडणूक आयुक्त उपस्थित राहतील. तसेच केंद्रीय आरोग्य विभागाचे ज्येष्ठ अधिकारीही सहभागी होतील. निवडणूक आयोग आरोग्य अधिकाऱयांकडून परिस्थितीची माहिती घेईल. वातावरण निवडणुका घेण्यास अनुकूल नसेल तर कदाचित त्या पुढे ढकलण्याचा निर्णय होऊ शकतो, असे बोलले जात आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचा एक आठवडय़ांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. तसेच या महिन्याच्या अखेरीस निवडणुकांसंबंधी निर्णय घेण्याचीही घोषणा केली होती. तथापि, हा निर्णय कदाचित आज सोमवारीच होऊ शकतो. एकदा निवडणुकांची प्रक्रिया प्रारंभ झाल्यानंतर त्या पुढे ढकलणे कठीण जाईल, याची आयोगाला जाणीव आहे. परिणामी अधिसूचना काढण्याआधीच निवडणुका घ्यायच्या की नाही, हे निर्धारित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारच्या बैठकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.