प्रतिनिधी / प्रतिनिधी
ढेकोळी येथील शासकीय ठेकेदार बसवंत लक्ष्मण अडकुरकर यांच्या कडून पाच लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून मांडेदुर्ग येथील अनिल जोतिबा तळगुळकर यांच्यासह अन्य साथीदार विरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी बसवंत अडकुरकर व आरोपी अनिल तळगूळकर हे एकमेकांना परिचयाचे आहेत. जानेवारी 2019 मध्ये पाटणे फाटा ते मोटणवाडी रस्त्याचे काम सुरू असताना अनिल तळगूळकरांनी माझ्या टक्केवारीचे काय झाले म्हणून ठेकेदारास शिवीगाळ केली होती. वरील रकमेची मागणी करून रक्कम न दिल्यास आंदोलनाची धमकी दिली होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पाटणे फाटा ते माणगाव रस्त्याच्या कॉर्नर वरील कलावती हॉटेल समोर ही पाच लाखांची मागणी केली होती. दि. 7 डिसेंबर 2020 रोजी दुपारी पाटणे फाटा ते मोटणवाडी मार्गावरील हॉटेल सागर समोरचे खड्डे भरण्याचे काम सुरू असताना तिथे तीन-चार साथीदारांसह येऊन अनिल तळगुळकरांनी काम बंद पाडले.
लोकही जमले. त्यावेळी बसवंत अडकुरकर यांनी आपले काम दर्जेदार असल्याचे पटवून देताच लोक गेले. तेव्हा अनिल तळगुळकर व साथीदारांनी पाच लाख दे नाहीतर तुला जिवंत सोडत नाही म्हणून धमकी दिली. त्यातील एक साथीदाराने आपल्याला चाकू दाखवला, असे फिर्यादीत बसवंत अडकुरकर यांनी म्हटले आहे. फिर्यादीवरून 385, 387, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.