वार्ताहर/ कोयना वसाहत
कराड तालुक्यातील आगाशिव डोंगर परिसरासह शेतांमधे बिबटय़ाचा वावर वाढला असून शनिवारी आक्रमक झालेल्या बिबटय़ाने पाच वर्षांच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. भरदिवसा मानवीवस्ती परिसरात पंजा मारून बिबटय़ाने ओम विजय शिंदे वय (वय 5) याच्यावर हल्ला केला. या हल्ल्याने खळबळ उडाली असून विंग-शिंदेवाडी परिसरात बिबटय़ाची दहशत निर्माण झाली आहे.
दरम्यान बिबटय़ा दिसताच ओमच्या कुटूंबियांनी आरडाओरडा करत बिबटय़ाला घालवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेने विंग-शिंदेवाडी परिसर प्रचंड दहशतीखाली आला आहे. वनविभागाने बिबटय़ाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थ़ळारून मिळालेल्या माहितीनुसार विंग, चचेगाव, शिंदेवाडी, घारेवाडी, कोळे येथील डोंगराळ भागात आणि असणाऱया शेतात बिबटय़ाचा वावर वाढला आहे. पाळीव जनावरांवर बिबटय़ांचे हल्ले वाढले असून मानवी वस्तीत अनेकदा बिबटय़ाचे दर्शन झाल्याचे घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान शनिवारी दुपारी ओम हा पाच वर्षांचा मुलगा फडकेवस्ती येथे शेतात खेळत होता. त्यावेळी त्याच परिसरात बिबटय़ाचा वावर सुरू होता. झाडांच्या आडोशाला असलेल्या बिबटय़ाने अचानक ओमच्या दिशेने झेप घेत त्याच्यावर हल्ला केला. त्याला पंजा मारत बिबटय़ाने जखमी केले. त्याचे कुंटुबीय शेतातील कामात व्यस्त होते.
वनरक्षक रमेश जाधवर व अन्य कर्मचाऱयांनी घटनास्थळी येऊन भेट देऊन पाहणी केली. मुलांची विचारपूस केली. जखमी ओमला उपचारासाठी कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. दरम्यान रात्री येथील मसोबा माळ परिसरात एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करताना बिबटय़ास एका शेतकऱयाने पाहिल्याचे सांगण्यात आले. गावकऱयांकडून बंदोबस्ताची मागणी त्याद्वारे केली आहे. मुलांवर हल्ल्याच्या घटनेनंतर संबधीत विभाग आता तरी जाग येणार का बंदोबस्त करणार का, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
मुलाला ओढत नेण्याचा बिबटय़ाचा प्रयत्न फसला
ओमवर हल्ला करत त्याला बिबटय़ाने उसाच्या शेतात ओढत नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहताच नातेवाईक आरडाओरडा करत तिकडे धावले. त्यांनी बिबटय़ाच्या तावडीतून ओमला सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे बिबटय़ा पसार झाला. या घटनेने ओमसह कुटूंबियांचा अक्षरशः थरकाप उडाला.