गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिलेली माहिती, घरोघरी प्रचारात सहभाग
प्रतिनिधी / मडगाव
इस्टर संडेच्या दिवशी मतदार घरी उपलब्ध असल्याने मडगाव पालिकेसाठीच्या उमेदवारांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून कौल मागितला. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी प्रभाग 11 चे उमेदवार राजू (पाकलो) नाईक यांच्या पाजीफोंड भागात प्रचार केला असता मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
राजू नाईक यांची पुन्हा पाजीफोंडवासियांना गरज असल्याचे बहुतेक मतदारांनी यावेळी बोलून दाखविल्याचे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले. काही उमेदवार फक्त मतविभागणी करण्यासाठी निवडणुकीत उतरले असून अशांना मते देऊन आपली मते वाया घालवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राजू नाईक हे सदर प्रभागाचे सलग 15 वर्षे नगरसेवक राहिले होते. यापूर्वी आपण येथे भरघोस विकासकामे मार्गी लावली आहेत. आपणास पाजीफोंड व जुन्ता क्वॉर्टर्सवासियांची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी. आमदार सरदेसाई यांच्या साथीने प्रभागाचा विकास घडवून आणताना आपण लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे उमेदवार नाईक यांनी सांगितले.
कोविड काळात नाईक आमच्या मदतीला धावून आले तसेच पालिकेत एखादे काम असल्यास ते पाजीफोंड येथील प्रभाग 11 च्या रहिवाशांना नेहमीच मदत करत आले आहेत. यंदा आम्ही त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार, असे उल्हास नाईक या समर्थकाने स्पष्ट केले.