प्रतिनिधी / कुडाळ:
पाट-दळवीवाडी येथील दाभोलकर कुटुंबाकडे गेल्या अठरा वर्षांपासून शिधापत्रिका नव्हती. पं. स. माजी सदस्य शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या पाठपुराव्याने त्यांना अखेर शिधापत्रिका मिळाली.
पाट-दळवीवाडी येथील दत्ताराम दाभोलकर, देवयानी दाभोलकर, सागर दाभोलकर व अर्जुन दाभोलकर या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मोलमजुरी करून गुजराण करणाऱया या कुटुंबाकडे गेल्या अठरा वर्षांपासून शिधापत्रिका नव्हती. या कुटुंबातील सागर या तरुणाने श्रीरंग प्रभू यांच्या माध्यमातून बंगे यांची भेट घेतली आणि व्यथा मांडली. बंगे यांनी कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांची भेट घेऊन ही शिधापत्रिका का मिळाली नाही, याची वस्तुस्थिती सांगितली. अखेर फाटक यांनी ही शिधापत्रिका द्यावी, अशी सूचना केली.
आमदार वैभव नाईक यांनीही तहसीलदार फाटक यांना त्या कुटुंबातील व्यक्तींना शिधापत्रिका देण्याची सूचना केली. अखेर अठरा वर्षांनी दाभोलकर कुटुंबाला शिधापत्रिका मिळाली. बंगे यांच्या हस्ते सागर दाभोलकर यांना शिधापत्रिका सुपुर्द करण्यात आली. सरपंच अर्चना बंगे, श्रीरंग प्रभू, युवासेना हुमरमळा उपशाखाप्रमुख विनोद शिरसाट, दशरथ मार्गी उपस्थित होते. दाभोलकर कुटुंबाने बंगे आणि आमदार नाईक यांचे आभार मानले.