सातारा / प्रतिनिधी :
युएस सरकारचा गुप्तचर अधिकारी असल्याचे सांगून सातारच्या तरुणाने पुण्यातील उच्चशिक्षित तरुणीला तब्बल 10 लाखांचा गंडा घातला. त्याने आपल्याकडे भारत, अमेरिका आणि दुबईची जबाबदारी असल्याची थाप मारली. हा धक्कादायक प्रकार औंध येथे घडला. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी तात्काळ सुत्रे फिरवत तोतया गुप्तचर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या.
अमित चव्हाण (व़य 30, रा. पाटण, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत धायरी येथील एका 28 वर्षीय तरुणीने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेल्या युवतीने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. संशयित अमित हा चाकण परिसरात तिच्यासोबत राहण्यास होता. एप्रिल 2021 मध्ये अमित आणि त्या तरुणीची बेटर हाफ या सामाजिक माध्यमावर भेट झाली. यावेळी त्याने तिला अमेरिकेतील गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचे सांगून त्याच्यावर भारत, दुबई, अमेरिकेची जबाबदारी असून, 154 देश हॅण्डल करत असल्याचे सांगितले. भारतात तपासासाठी आलो असल्याचे सांगून त्याने तिला विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरुच होते. याच दरम्यान, त्याने तिला लग्नाची मागणी घातली. यावेळी आरोपीने त्याची ओळख राहुल राजाराम पाटील अशी सांगितली.
याच दरम्यान, दोघे बाणेर येथे भेटले. तेथे त्याने तरुणीला तिचा मोबाईल मागितला. त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही तिचा मोबाईला त्याला दिला. त्याने तिला माझ्यावर आणि तुझ्यावर रॉ नजर असल्याची भिती घातली. फिर्यादीला भिती दाखवून तरुणीला तिचा लॉपटॉप फॉरमॅट करण्यास सांगितला. विविध कारणे सांगून त्याने तिचे सिमकार्ड एटीएमकार्डही ताब्यात घेतले. तसेच तिला त्याच्या मिहिर जैन या मित्राचे सुरत, गुजरात येथील टेक्सटाईल कंपनीतून कमी किमतीत व लवकर मटेरियल मिळवून देतो असे अमिष दाखवले. वारंवार तिला रॉची भिती दाखवून त्याने तिच्या खात्यातुन तब्बल 8 लाख 37 हजार रुपये ट्रान्स्फर केले. तसेच तिचा ऍपल कंपनीचा 1 लाख 28 हजार रुपयांचा लॅपटॉपचाही अपहार केला. असा एकूण आरोपीने तरुणीला 10 लाखांचा गंडा घातला.
दरम्यान, रॉ अधिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी माझा मोबाईल एक महिना बंद असेल असे सांगितले. परंतु एक महिन्यानंतर त्याचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्याने तीने पोलीस ठाणे गाठून त्याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ त्यास अटक करत तोतयागिरी उघड केली.