सीसीटिव्ही कॅमेऱयात चोरटय़ाच्या हालचाली कैद
शहर प्रतिनिधी/ पाटण
पाटण शहरात घरफोडय़ांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले असून गुरूवारी मध्यरात्री शहरात 4 घरे व 2 दुकाने अज्ञात चोरटय़ांनी फोडली आहेत. अज्ञात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या चोऱयांची नोंद शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, शहरात संशयित व्यक्ती फिरताना दिसून आल्यास तत्काळ पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन पाटण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गुरूवारी 13 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील मुख्य पेठेतील अमोल अरुण खांडके यांच्या मालकीच्या न्यू कलाकिर्ती फोटो स्टुडिओच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरटय़ाने 2 हजार 500 रुपये, राजेंद्र गजानन टोपले यांच्या मालकीच्या त्रिमूर्ती सुईंग मशिन दुकानाचा लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून एक हजार रुपये अशी रक्कम अज्ञात चोरून नेली. शेजारील एका घरात चोरीचा प्रयत्न झाला. तसेच नवीपेठ येथील प्रशांत चाळके यांच्या बंद घरातून 2 हजार रुपये रोख चोरून नेले. तर शेजारील बादल विनायक इंगवले व सुजाता राजेंद्र घाडगे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला.
पाटण शहरात भरवस्तीत एका रात्रीत 4 घरे व 2 दुकाने चोरटय़ांनी फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटा सीसीटिव्ही कॅमेऱयात कैद झाला असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.