बंगाल वॉरियर्स-दबंग दिल्ली लढत बरोबरीत
वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या 8 व्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या 107 व्या सामन्यात गुरनाम सिंगच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पाटणा पायरेट्स संघाने पुणेरी पलटनचा 43-26 अशा गुणांनी पराभव करत सर्वप्रथम प्ले-ऑफ गटात प्रवेश केला. या स्पर्धेतील दुसऱया एका चुरशीच्या सामन्यात विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीला 39-39 असे बरोबरीत रोखले.
पाटणा पायरेट्स आणि पुणेरी पलटन यांच्यातील सामन्यात गुरनाम सिंगच्या शानदार खेळामुळे पुणेरी पलटन संघाच्या कबड्डीपटूंवर शेवटपर्यंत दडपण राहिले. या सामन्यात गुरनाम सिंगने 13 गुण मिळविले. पाटणा पायरेट्सने आतापर्यंत ही स्पर्धा तीनवेळा जिंकली आहे. गुरुवारच्या सामन्यातील विजयामुळे पाटणा पायरेट्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान घेत सर्वप्रथम प्ले-ऑफ गटात प्रवेश केला. अनुप कुमारच्या मार्गदर्शनाखालील पुणेरी पलटन संघातील अस्लम इनामदारने 9 गुण मिळविले. सामन्यातील मध्यंतरापर्यंत पाटणा संघाने पुणे संघावर केवळ एका गुणाची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात पुणेरी पलटनचे दोनवेळा सर्व गडी बाद झाल्याने पाटणा पायरेट्सने हा सामना 16 गुणांच्या फरकाने जिंकला. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना पाटणा संघाने 3 गुणांची बढत मिळविली होती. पण शेवटच्या क्षणी गुरनाम सिंगने पुणेरी पलटनचे सर्व गडी बाद करून आपल्या संघाला 10 गुणांची आघाडी मिळवून दिली. शेवटच्या दोन मिनिटांमध्ये पाटणा संघातील बचावफळीत खेळणाऱया मोहम्मदेज्राने आपल्या चढाईवर पुणेरी पलटनचे 3 गडी बाद केले. अखेर पाटणा संघाने हा सामना 16 गुणांच्या फरकाने जिंकून पुणेरी पलटनचे आव्हान संपुष्टात आणले.
गुरुवारी या स्पर्धेतील शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला विद्यमान विजेता बंगाल वॉरियर्स आणि दबंग दिल्ली यांच्यातील सामना 39-39 असा बरोबरीत राहिला. या सामन्यातील शेवटचे मिनिट बाकी असताना दिल्ली संघातील नवीनकुमारने आपल्या चढाईवर 3 गुण मिळविले. त्यामुळे दिल्ली संघाचा या सामन्यात आपण विजयी झाल्याचा गैरसमज झाला. पण मनजितसिंग चिल्लारने 50 सेकंद बाकी असताना आपल्या संघाला 3 गुण मिळवून देत हा सामना अखेर बरोबरीत सोडविला. विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सतर्फे मणिंदरसिंगने 16 गुण तर दबंग दिल्लीच्या नवीनकुमारने 16 गुण नोंदविले. हा सामना बरोबरीत राहिल्याने बंगाल वॉरियर्स संघाला प्ले-ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. या लढतीतील मध्यंतरापर्यंत दिल्ली दबंगने बंगाल वॉरियर्सवर 19-18 अशा केवळ एका गुणाची आघाडी मिळविली होती. दिल्ली दबंगच्या नवीनकुमारच्या शेवटच्या चढाईत बंगालने संभाव्य सर्व गडी बाद होण्याची संधी वाचविल्याने हा सामना बरोबरीत राहिला.