सतीश धोंड यांच्या विरोधात पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे वृत्त
प्रतिनिधी/ पणजी
लाटंबार्से मधील भाजपच्या पराभवावरून स्थानिक आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांची नाराजी पक्षास भोवणार, अशी चिन्हे दिसत आहेत. पाटणेकरांना विश्वासात न घेता मगो नेते नरेश सावळ यांना घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाचे महामंत्री सतीश धोंड यांनी प्रचार केल्याने लाटंबार्सेतील जागा भाजपने गमावली, अशी धारणा राजेश पाटणेकर यांची झालेली आहे. या संदर्भात धोंड यांच्या विरोधात पक्ष श्रेष्ठींकडेही तक्रार केल्याचे वृत्त आहे.
राज्यात भाजपने दोन्ही जिल्हा पंचायतीवर झेंडा फडकाविला असला तरी मांद्रे येथील भाजपच्या झालेल्या पराभवाने स्थानिक आमदार दयानंद सोपटे हे प्रचंड नाराज झालेले आहेत.
विश्वासघात झाल्याची सोपटेंची धारणा
काही भाजप नेत्यांनीच पक्षाविरोधात काम केले अशी त्यांची धारणा झालेली आहे. त्यांनी आपली कैफियत पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांसमोर मांडली आहे. सोपटे यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपच्याच काही पदाधिकाऱयांनी व्यूहरचना केली असल्याचे वृत्त सोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी दिले. मांद्रेमध्ये सोपटे यांचा विश्वासघात झाल्याचे सोपटे यांच्या पदाधिकाऱयांचे म्हणणे आहे. या घटनेचे दुष्परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतात.
पाटणेकरांकडून धोंड यांच्या विरोधात तक्रार?
सभापती राजेश पाटणेकर यांच्या हातात सरकारच्या चाव्या आहेत. सरकारमध्ये 12 फुटीर आमदारांचे भवितव्य राजेश पाटणेकर यांच्या हातात असताना त्यांची नाराजी पक्षाने ओढवून घेतली आहे. लाटंबार्से येथील घटनेमुळे राजेश पाटणेकर प्रचंड नाराज असून त्यांनी पक्षाच्या महामंत्री विरोधात दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार नोंदविली आहे, अशी माहिती पाटणेकर यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांनी दिली.
पाटणेकरांना शह देण्यासाठी सावळांना आणले पुढे
सभापती राजेश पाटणेकर यांना आगामी निवडणुकीत भाजपची उमेदवारी दिली जाऊ नये यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आणि गेले काही दिवस नरेश सावळ यांना पक्षातील काही प्रमुख क्यक्तींनी जवळ केले. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे पूर्ण सहकार्य पाटणेकरांना होते. मात्र मुख्यमंत्री आणि महामंत्र्यांनी अचानक काही ठिकाणी सावळ यांना जवळ घेतले. एवढेच नव्हे तर सावळांच्या सांगण्यावरून सभा घेतल्या. परिणामी सर्व बुथवरून भाजपमधील नाराजांनी भाजप विरोधात मतदान केले. नरेश सावळ हे मगोचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पहात होते. त्यांना भाजपने प्रवेशही दिला नव्हता, असे असताना ते उघडपणे भाजपच्या सभेत कसे? हा प्रश्न भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना पडला होता.
सभापती राजेश पाटणेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री सभेला गेले, त्यातून राजेश पाटणेकर यांना फार मानसिक त्रास झाल्याची माहिती पाटणेकर यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. मात्र राजेश पाटणेकर यांना आगामी निवडणुकीत अर्धचंद्र देणार असे वृत्त काहीनी खोडसाळपणे पसरविले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचाही गोंधळ उडाला.
पाटणेकरांची नाराजी भोवण्याची शक्यता
राजेश पाटणेकर यांच्या नाराजीने आता पक्षाला काही सावध पावले उचलावी लागतील. ऐन निवडणुकीत सभापतींना पक्षाने नाराज केल्याने त्यांनीही आता पक्षश्रेष्ठींकडे दाद मागीतल्याचे वृत्त आहे. गेल्या निवडणुकीत ‘हाय वोल्टेज ड्रामा’ याच मतदारसंघात घडलेला. त्यात भाजपला या ठिकाणी पराभव सहन करावा लागला. यावेळी देखील गुपचुपपणे हा प्रकार झाला. त्यात भाजपचे नुकसान झाले. राजेश पाटणेकर यांचे असंख्य कार्यकर्तेही डिचोलीत नाराज झालेले आहेत. एका पदाधिकाऱयांने सांगितले की, पक्षासाठी हा प्रकार फार अडचणीचा आहे. मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालावे.
संजय शेटय़ेना भाजपमध्ये घ्यावे : पाटणेकर
सभापती राजेश पाटणेकर यांच्याशी सायंकाळी संपर्क साधला असता आपण कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. परंतु भाजपच्या लाटंबार्से पराभवावरून आपल्याला खेद झाल्याचे ते म्हणाले. संजय शेटय़े यांना भाजपमध्ये प्रवेश द्या, असे आपण पक्षाला सांगितले होते, आपले म्हणणे मान्य झाले असते तर लाटंबार्सेचा पराभव झाला नसता. एवढेच ते म्हणाले व भ्रमणध्वनी बंद केला.