प्रतिनिधी / कोल्हापूर
पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता यशवंत दत्तोबा वासुदेव (वय 83, रा. प्लाट नंबर 5, श्रीराम निवास, रिंग रोड राजेंद्र नगर) यांचे गुरूवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी नगरसेवक महेश वासुदेव यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी 9 वाजता कसबा बावडा स्मशानभूमीत आहे.
गोंधळी-जोशी-वासुदेव या भटक्या समाजातील कुटुंबात जन्मलेल्या वासुदेव यांनी 1962 साली सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली होती. प्रारंभी त्यांनी कोल्हापूर पॉलिटेक्निकमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षेतून ते डेप्युटी इंजिनिअरपदी नियुक्त झाले. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काळम्मावाडी धरण दूधगंगा प्रकल्पासह विविध प्रकल्पांवर काम केले. सांगली, सातारा जिल्हा परिषदेतही जबाबदारी पार पाडली. पंढरपूर पाटबंधारे विभागातही योगदान दिले.
सातारा जिल्ह्यातील धोम, कन्हेरे धरणाच्या कामाची जबाबदारी पार पाडली. औरंगाबाद, चंद्रपूर येथेही काम करण्याची संधी त्यांना लाभली. 1997 मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतरही ते युवा अभियंत्यांना मार्गदर्शन करत असत. माजी खासदार लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे ते विद्यार्थीदशेत निकटवर्तीय होते.