दोडामार्ग/ वार्ताहर-
सासोली येथील पाटये पुनर्वसन मधील सातेरी केळबाय पंचायतन व देव भुतोबा मंदिराच्या परिसरातील रामायण कालीन प्रसंग सांगणाऱ्या पाषाणांची पुरातत्त्व अभ्यासकांनी भेट देऊन माहिती घेतली. पुणे येथील पुरातत्त्व अभ्यासक श्रीमती साईली पालांडे व गोव्यातील पुरातत्त्व अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांनी या पाषाणांचा अतिशय बारकाईने अभ्यास केला.
पाटये येथील या जुन्या मंदिराच्या अवशेषांची पाहणी करण्यासाठी हे अभ्यासक खास पाटये मध्ये आले होते. पाहणी दरम्यान त्यांना एक शिल्पपट्टी आढळली त्यावर रामायणातील पात्रे व प्रसंग कोरण्यात आलेले दिसले. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान व दशमुखी रावण यांच्या शिल्पासोबत रावण वधानंतरची विजयी मिरवणूक, राम – लक्ष्मण यांना उचलून घेतलेला हनुमान, रावणाचा शिरच्छेद आदी प्रसंग ह्या शिल्पांमध्ये त्यांना दिसून आले. सदर शिल्पावरील कोरीव काम बारकाईने पाहिले असता किमान सातशे ते साडेसातशे वर्षांपूर्वीच्या कदंब राजवटीशी त्यांचा संबंध असल्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली.
तसेच या कोरीव कामासाठी लागणारा दगड देखील बाहेरनच आणला असावा असे या अभ्यासकांनी स्पष्ट केले। केवळ पाटयेच नव्हे तर ठिकठिकाणी असणाऱ्या अशा जुन्या मंदिरातील कोरीव शिल्पांचे संवर्धन होणे हार आवश्यक असून येणाऱ्या पिढीला ते मार्गदर्शक ठरू शकते असे श्रीमती पालांडे व श्री. केरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी पाटये या गावातील ग्रामस्थांनी या अभ्यासकांचे स्वागत केले. यावेळी भिवा गवस, प्रकाश गवस, सत्यवान गवस, गणेश गवस, प्रथमेश माजगावकर, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील संजय नाटेकर, अनुराग सिनारी, अमित सुतार आदी उपस्थित होते