प्रतिनिधी / सातारा :
तामजाईनगरमधील कात्रज दुध डेअरीजवळ आसमा रशीद शेख (वय 27) यांची काळ्या रंगाची सॅक अज्ञात इसमाने शुक्रवारी रात्री 8.30 ते 8.45 च्या सुमारास चोरून नेली. या सॅकमध्ये सोन्या-चांदीच्या 1 लाख 56 हजार रूपये किंमतीच्या वस्तू होत्या. या चोरीची फिर्याद आसमा शेख यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, येथील शाहू स्टेडियम मध्ये असणाऱ्या तिरूपती बालाजी मोबाईल शॉपी ते शाहूपुरी चौकाजवळील असलेले कात्रज दुध डेअरी ऍण्ड अजिंक्य फुड्स नावाच्या दुकानाजवळ आसमा शेख काळ्या रंगाची सॅक घेवून निघाल्या होत्या. यावेळी अज्ञान व्यक्तीने त्यांचा पाठलाग करून ती सॅक चोरून नेली. या सॅकमध्ये 11 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, अर्धा ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे बदामाचे पँडल, एक 12 ग्रॅम वजनाची सोन्याची बॉक्स चेन त्यामध्ये अर्धा ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे बदामाचे पँडल, एक 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 3 ग्रॅम वजनाची नारंगी रंगाची खडा असलेली सोन्याची अंगठी, एक जोड 6 ग्रॅम वजनाचे डिझाईन असलेले व खाली साखळी असलेले सोन्याचे कानातले, एक जोड चांदीचे पैंजण, ग्रे रंगाचा एक रेडमी 4 ए कंपनीचा मोबाईल हॅडसेट, सिमकार्ड, 3 हजार रोख रक्कम, पेनड्राईव्ह, मोबाईल चार्जर, कागदपत्रे असा 1 लाख 56 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. अधिक तपास पोलीस हवालदार माने करत आहेत.