बेळगाव / प्रतिनिधी
शहर परिसरात दरवषी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून मोटार सायकलसोबत म्हैस पळविण्याचे आयोजित केले जाते. यंदादेखील सालाबादप्रमाणे शुक्रवारी पाडव्यादिवशी शहरात विविध ठिकाणी गवळी बांधवांनी म्हशींना सजवून पळविले.
गवळी बांधवांना प्रोत्साहन देण्याबरोबर दुभत्या जनावरांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवषी पाडव्यानिमित्त म्हशी पळविल्या जातात. शहरातील कोनवाळ गल्ली, कॅम्प परिसर, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, रयत गल्ली, पाटील गल्ली वडगाव, चव्हाट गल्ली यासह ग्रामीण भागातही म्हशी पळविण्यात आल्या. शहरातील गवळी बांधवांनी यामध्ये सहभागी होत उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.
दिवाळी पाडव्यानिमित्त गवळी बांधवांनी आपल्या म्हशींना सजवून त्यांच्या शिंगांना गोंडे, गळय़ात साखळय़ा व रंगीत मण्यांच्या माळा, पायात गोंडे चाळ व शिंगांना रंग लावून सजविले होते. काही ठिकाणी सजविलेल्या म्हशींची वाजत -गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे गल्लीतून फिरणाऱया म्हशीदेखील आकर्षण ठरत होत्या.
बापट गल्ली
शुक्रवारी गवळी बांधवांनी आपल्या सजविलेल्या म्हशांसह बापट गल्लीत फेरी मारली. यावेळी कालिकादेवी युवक मंडळातर्फे गल्लीत दाखव झालेल्या गवळी बांधवांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, उपाध्यक्ष गजानन निलजकर उपस्थित होते.
शहरातील पांगुळ गल्ली, भातकांडे गल्ली, मेणसी गल्ली, कामत गल्ली, चव्हाट गल्ली आदी ठिकाणी सजविलेल्या म्हशींना फिरवून नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिराजवळ सांगता करण्यात आली. या म्हशींच्या मिरवणुकीसाठी खास कोल्हापूर येथून वादक बोलाविण्यात आला होता.
दिवाळी पाडव्यानिमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे शनिवारी म्हशींची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी म्हशींच्या शिंगांना रंगरंगोटी करून गळय़ात घंटय़ा व डोकीवर मोराचे पिस बांधण्यात आले होते. यानंतर कॅम्प येथे म्हशींचे पूजन करून सांगता करण्यात आली.