पायाभूत सुविधा विभागाचे अधिकारी घेणार मनपा आयुक्तांची भेट : एल ऍण्ड टी कंपनी पाणीपुरवठय़ासाठी उत्सुक
प्रतिनिधी / बेळगाव
संपूर्ण शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेचे काम सुरू करण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीमुळे हस्तांतर प्रक्रिया रखडली होती. मात्र, निवडणूक कामामधून महानगरपालिका आयुक्त मुक्त झाले आहेत. त्यामुळे हस्तांतर प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा मंडळाच्यावतीने मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरातील दहा वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येतो. उर्वरित 48 वॉर्डांमध्ये योजनेचे विस्तारीकरण करून संपूर्ण शहरवासियांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने योजना राबविण्यात येणार आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे कंत्राट एल ऍण्ड टी कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी एल ऍण्ड टी कंपनीने ग्राहक सर्वेक्षण करून अहवाल तयार केला आहे.
पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाकडील कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे हस्तांतर करावा लागणार आहे. पाणी पुरवठय़ाची मुख्य जबाबदारी महापालिकेची आहे. पण, हिडकल पाणीपुरवठा योजना राबविताना पाणी पुरवठय़ाचे काम पाणीपुरवठा मंडळाकडे सोपविण्यात आले होते. पण आता चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाकडील कारभार महापालिकेला हस्तांतर करून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर महापालिकेकडून एल ऍण्ड टी कंपनीकडे हस्तांतर करावे लागणार आहे.
पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी जलकुंभांची उभारणी, जागांची खरेदी व भू-संपादन करण्यात आले होते. काही ठिकाणी पंप हाऊस निर्माण करण्यात आले आहे. सदर मालमत्ता महापालिकेच्या मालकीची आहे. त्यामुळे सर्व तपशिलाची माहिती घेऊन हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
एप्रिल महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात पाणी पुरवठय़ाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे हस्तांतर करण्यात येणार होता. पण महापालिका आयुक्त जगदीश के. एच. लोकसभा पोटनिवडणुकीत व्यस्त असल्याने हस्तांतर प्रक्रिया रखडली होती. पण महापालिका आयुक्त निवडणूक कामामधून मुक्त झाल्याने हस्तांतर प्रक्रिया मार्गी लागण्याची शक्मयता आहे. याकरिता पायाभूत सुविधा खात्याचे अधिकारी (केयुआयडीसी) महापालिका आयुक्तांची उद्या मंगळवारी भेट घेऊन हस्तांतराबाबत चर्चा करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.