कृष्णाकाठ योजनेच्या रुपरेषेविषयीही चर्चा
प्रतिनिधी /बेंगळूर
पाटबंधारे खात्याकडून जारी करण्यात येणाऱया पाणीपुरवठा योजना, तलावांमध्ये पाणीसाठा, पाणीपुरवठा प्रकल्पांचे आधुनिकीकरण, केंद्र सरकारच्या अनुदानातून राबविण्यात येणाऱया योजनांची वस्तूस्थिती आणि प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतला. बुधवारी त्यांनी पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी अधिकाऱयांना प्रलंबित योजना आणि परिणामकारी अंमलबजावणीच्या सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘कृष्णा’ येथे पाटबंधारे खात्यातील अधिकाऱयांशी चर्चा करताना बोम्माई यांनी उत्तर कर्नाटकातील कृष्णाकाठ योजनेच्या दुसऱया टप्प्यातील कामे हाती घेण्यासंबंधी सूचना केल्या. तसेच या योजनेसाठी भूसंपादन प्रक्रिया आणि नागरिकांचे पुनर्वसन यासंबंधी हाती घ्यावयाच्या उपाययोजनांसाठी तयार केलेल्या रुपरेषेविषयीही चर्चा केली.
कामांच्या प्रगती मूल्यमापन करा
सध्या राबविण्यात येणाऱया लघु पाणीपुरवठा योजनांच्या रुपरेषेची फेरपडताळणी, योजनांसाठीचा खर्च आणि त्यानुसार कामांची प्रगती याबाबतचे मूल्यमापन करण्याची सूचनाही मुख्यमंत्री बोम्माई यांनी अधिकाऱयांना दिली. कृष्णाकाठ योजना, भद्रा पाणीपुरवठा योजना, एत्तीनहोळे योजना, विविध जलाशयांच्या योजना आणि या योजनेंतर्गत पाणीपुरवठय़ाची क्षमता यांचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी
घेतली.