कॅम्प परिसरात निर्माण झाली समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथील आसदखान दर्ग्याजवळ जलवाहिनीला गळती लागल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेले. तसेच रस्ता खचला असून वाहनधारकांच्या लक्षात आले नाही. परिणामी विटा वाहतूक करणारा ट्रक चिखलात रुतला. त्यामुळे वाहन बाहेर काढण्यासाठी वाहनचालकाला कसरत करावी लागली.
टिळकवाडी परिसराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला रविवारी सायंकाळी गळती लागली. मुख्य वाहिनी असल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेले. पाणीपुरवठा बंद करण्यास विलंब झाल्याने येथील रस्त्यावर पाण्याचे तळे साचले होते. मोठय़ा प्रमाणात पाणी वाहल्याने परिसरातील रस्ता खचला होता. मात्र रस्ता खचल्याचे वाहनचालकाच्या लक्षात आले नाही. दुरुस्तीसाठी एल ऍण्ड टी कंपनीचे अधिकारी व कामगार दाखल झाले होते.
सकाळी 11 वा. याची पाहणी करत असतानाच विटा वाहतूक करणारा ट्रक गळतीच्या बाजूने जात असताना रस्त्यावर चिखलात रुतला. ट्रकमध्ये विटा असल्याने तसेच सर्वत्र पाणी मुरल्याने ट्रक बाहेर निघाला नाही. शेवटी जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्याची वेळ आली. त्यानंतर एल ऍण्ड टी कंपनीच्या कामगारांनी बॅरिकेड्स लावून वाहतुकीस रस्ता बंद ठेवला.