प्रधान मुख्य अभियंत्याने काढला होता आदेश : साबांखामंत्री व मुख्यमंत्र्यांनही ठेवले अंधारात
प्रतिनिधी / पणजी
पाणीपट्टीत दरवाढ करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. प्रधान मुख्य अभियंत्याने हा दरवाढीचा आदेश जारी करण्यापूर्वी आपल्याला व मुख्यमंत्र्यांनाही विचारात घेतले नाही, असे साबांखामंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले.
पाणीपट्टीत दरवाढ करण्याच्या प्रस्तावावर जानेवारी 2020 मध्ये सा. बां. खा. मंत्री दीपक पाऊस्कर यांनी स्वाक्षरी केली होती. त्यात प्रतियुनिट रु. 1 अशी दरवाढ सुचविली होती. प्रत्यक्षात त्याची अधिसूचना आता एवढय़ा उशिरा व चुकीच्या वेळी काढण्यात आली. प्रधान मुख्य अभियंत्याने हा आदेश जारी करण्यापूर्वी आपल्याला व मुख्यमंत्र्यांनाही विचारात घेतले नाही, अशी कैफियत मांडून सा. बां. खा मंत्री दीपक पाऊस्कर यांनी सदर आदेशाला सध्या स्थगिती द्यावी, असा शेरा मारून फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्याला स्थगिती दिली आहे.
सा. बां. खा. मंत्री दीपक पाऊस्कर यांनी सांगितले की, यापूर्वी 2015 मध्ये पाणीपट्टीत वाढ केली होती. त्यावेळी एक निर्णय घेतला होता. दरवर्षी पाणीपट्टी दरात 5 टक्क्यानी दरवाढ करावी. जानेवारीमध्ये आपल्याला बजेट समितीने विचारले की, आपण आतापर्यंत पाणीपट्टीत वाढ का केली नाही? त्यामुळे सरकारचे बरेच नुकसान झाले. त्यानंतर आपण प्रधान मुख्य अभियंत्याला बोलावून दरवर्षी 5 टक्के हे गृहित धरून पाणीपट्टीत वाढ सुचविणारा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. तसा प्रस्ताव आल्यावर त्यावर स्वाक्षरी केली. प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला. मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली. मान्यता दिल्यानंतर मुख्य सचिवांपर्यंत गेला त्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर अधिसूचना त्वरित जारी होणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही.
आदेश गेल्या तीन महिन्यात जारी झालाच नाही. आता कोरोनाचे संकट आहे. लॉकडाऊन चालू आहे. जनता अडचणीत असतानाच ही दरवाढ अचानकपणे जाहीर करण्यात आली. एक हजार लिटर पाण्यामगे रु. 1 अशीच ही दरवाढ आहे. मात्र ती चुकीच्यावेळी काढली. गेल्या चार महिन्यात आदेश का निघाला नाही, आणि ही अधिसूचना काढताना आपल्याला व मुख्यमंत्र्यांना देखील विश्वासात घेतलेली नाही. तसेच ही दरवाढ जानेवारीमध्ये जारी का केली नाही. गेल्या तीन ते चार महिन्यात राज्याला त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यास जबाबदार कोण? असा सवालही साबांखा मंत्री दीपक पाऊस्कर यांनी केला. त्यांनी फाईल मागवून घेतली आणि कोविड 19 चा काळ पूर्णतः संपुष्टात येईपर्यंत पाणीपट्टीत वाढ करण्यास स्थगिती दिली. त्यांनी झालेला सारा प्रकार मुख्यमंत्र्यांना कळविला. मुख्यमंत्र्यांनी फाईलवर स्वाक्षरी करून दरवाढीला स्थगिती दिली आहे.