केनियातून समोर आले हृदयद्रावक छायाचित्र
आफ्रिकेतील केनिया हा देश तीव्र दुष्काळाला तोंड देतोय. दुष्काळाचा प्रभाव तेथील वन्यप्राण्यांवरही दिसून येत आहे. अन्न आणि पाणी न मिळाल्याने वजीर भागातील साबुली वाइल्ड लाइफ सेंचुरीत 6 जिराफांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरची छायाचित्रे जगभरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हृदयद्रावक या छायाचित्रांमध्ये अन्न आणि पाण्याअभावी या जिराफांचे शरीर हाडांचा सापळा झाल्याचे दिसून येते. हे जिराफ पाण्याच्या शोधात जवळपास आटलेल्या एका जलाशयानजीक आले होते, जेथे चिखलात ते अडकून पडले होते. अंगात त्राण नसल्याने या जिराफांना तेथून बाहेर पडता आले नाही आणि तेथेच तडफडत त्यांनी प्राण सोडला आहे.
जिराफांचे मृतदेह अन्यत्र नेत ही छायाचित्रे काढण्यात आली. जलाशयाच्या उर्वरित पाण्याला दूषित होण्यापासून वाचविण्यासाठी मृतदेह तेथून हटविण्यात आले. या छायाचित्रांनी जगाला हादरवून सोडण्यासह पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष किती अंगलट येऊ शकते याचा विचार करण्यास भाग पाडले आहे.
30 टक्क्यांहून कमी पाऊस
उत्तर केनियात सप्टेंबरनंतर सरासरीच्या तुलनेत 30 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडल्याने दुष्काळाची स्थिती आहे. पावसाअभावी वन्यप्राण्यांवर विनाशकारी प्रभाव पडला आहे. पशूपालन करणाऱया समुदायांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पशुंसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यास अडचणी येत आहेत.
वन्यप्राण्यांना सर्वाधिक धोका वन्यप्राण्यांना दुष्काळाचा सर्वाधिक धोका आहे. पाळीव प्राण्यांना मदत केली जातेय, पण वन्यप्राण्यांची दखल घेणारा कुणीच नाही. नदीकाठावर शेती करण्यापासून रोखण्यात आले आहे. नदीपर्यंत पोहोचणे जिराफांना अवघड ठरल्याने स्थिती बिघडल्याचे बोर-अल्गी जिराफ सेंचुरीचा कर्मचारी इब्राहिम अली यांनी सांगितले.