पाण्यावर चालण्याची आणि हवेत उडण्याचे स्वप्न बाळगत असल्यास चीनचे पर्यटनस्थळ तुमची वाट बघत आहे. शितियानशिया हे फुजियान प्रांतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. तेथे लोक पारंपरिक पोशाख परिधान करून नदीवर चालताना आणि हवेत उडताना दिसून येतात. हे दृश्य दूरवरून पाहिल्यास एखाद्या ‘चमत्कारा’पेक्षा कमी वाटणार नाही.
या विशेष अनुभवासाठी दोन तारांचा वापर करून पर्यटकांना हवेत उचलण्यात येते, ही तार पर्यटकांच्या कंबरेला बांधली जाते, ज्यानंतर ते पाण्यावरून चालू शकतात किंवा ‘शस्त्रा’ंचा वापर करत हवेत स्टंट करून दाखवू शकतात. या तारांची लांबी 600 मीटर असून त्या जमिनीपासून 20 मीटर उंचीवर आहेत.
हे पार्क अलिकडेच सुरू करण्यात आले आहे. याची कल्पना चित्रपटांमध्ये पाण्यावरून धावणाऱया आणि हवेत स्टंट करणाऱया हिरोंपासून घेण्यात आली आहे. हा अनुभव घेऊ इच्छिणाऱयाला 128 युआन (सुमारे 1500 रुपये) खर्च करावे लागणार आहेत. यात कॉस्टय़ूम, प्रोप्स, मेकअप आणि हेअर स्टायलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. चीनने कोरोना महामारीच्या काळात देशांतर्गत पर्यटनावर अधिक भर दिला आहे. यानुसार देशातच अनेक पर्यटनस्थळे विकसित केली जात आहेत.