ऑनलाईन टीम / पुणे :
हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय कृष्णाजी जय दमाजी… जय पिलाजी…जय सयाजी… पानिपत वीर अमर रहे… अशा गगनभेदी घोषणांनी श्रीमंत गायकवाड सरकार सदरेचा परिसर दणाणून निघाला. बडोदा संस्थान संस्थापक सेनाखासखेल समशेर बहाद्दर, पानिपतवीर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार व पानिपत वीरांना मानवंदना देण्यात आली.
निमित्त होते, श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान पुणे, शिवशंभू प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ दावडी-निमगाव, खेड यांनी श्रीमंत गायकवाड सरकार सदर, दावडी येथे आयोजित पानिपत वीर मानवंदना कार्यक्रमाचे. कार्यक्रमाची सुरुवात गायकवाड किल्ल्यावर गायकवाड घराण्याचा भगवा ध्वज फडकावून करण्यात आली. त्यानंतर श्रीमंत गायकवाड सरकार सदरेवर दीप प्रज्वलन, गायकवाड तख्त पूजन, गायकवाडांचे पारंपरिक शस्त्र पट्टा यांचे पूजन करण्यात आले.
विश्व शिवकालीन मर्दानी युध्दकला महासंघाच्या राजेश पाटील, लखन जाधव गुरुजी, आचार्य लुगडे यांनी दंड, ढाल तलवार, पट्टा, वीटा ही पारंपरिक शस्त्र वापरुन शास्त्रोक्त पध्दतीने सादर केलेल्या मर्दानी युध्दकलेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जणू शिवकाल पुन:श्च एकदा जिंवत केला आणि उपस्थितांची मने जिंकुन घेतली.