ऑनलाईन टीम / पानिपत :
टोक्यो ऑलिम्पकिमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावणाऱया नीरज चोप्राची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. नीरजने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर दहा दिवसांनी मंगळवारी पानिपतमध्ये पोहोचला. समालखा येथिल हल्दाना बॉर्डरपासून त्याची गाडी खंडरा गावी पोहचली. मात्र, खंडरामध्ये त्याचा स्वागत कार्यक्रम पार पडत असतानाच अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नीरजची तब्येत बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नीरजला कोणत्या रूग्णालयात नेण्यात आले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, मागील तीन दिवसांपूर्वी नीरजला ताप आला होता, तसेच घसा खवखवण्याचा त्रास होत आहे. पण त्यातच चांगली बाब म्हणजे त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यानंतर नीरज घरीच होता.
नुकतेच नीरजने ट्रक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 121 वर्षांनंतर भारतासाठी सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. शनिवारी नीरजने दुसऱया प्रयत्नात 87.58 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर भारतात परतल्यावर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला होता. त्यात त्याची दगदग झाली आणि अतितणावामुळे नीरजला ताप आला असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानंतर आज पुन्हा त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात दाखल केले आहे.