कालाआमध्ये (हरियाणा) मराठा शौर्य दिवस कार्यक्रमात उमठल्या भावना : आठवणीने मराठा बांधव झाले भावूक
प्रतिनिधी / कोल्हापूर
हरियाणातील कालाआममध्ये (पानिपत) गुरुवारी अखिल भारतीय मराठा जागृती मंचच्या वतीने मराठा शौर्य दिवस साजरा करत पानिपतच्या लढाईत हौतात्म्य पत्करलेल्या मराठ्यांसह विविध जाती-धर्मातील हुतात्म्यांच्या शौर्यागाथेची आठवण आळविण्यात आली. मंचचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र मराठा (जाखले) यांच्या हस्ते कालाआममध्ये मराठा शौर्याची आठवण म्हणून उभारलेल्या स्मृतीस्तंभाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी भावुक होऊन पानिपतच्या लढाईचा आढावा घेतला. स्मृतिस्तंभाची आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मराठा बांधवांनी आता पुढाकार घ्यावा, असेही आवाहनही केले.
यंदाच्या वर्षी मराठी शौर्य दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जनजागृती फेरी व मार्गदर्शनपर आयोजित केली जाणारी सभा रद्द केली. मराठा शौर्य दिवस साजरा करण्याची परंपरा मात्र खंडीत केली नाही. कालाआम येथे फक्त मराठा जागृती मंचचे पदाधिकारीच उपस्थित राहिले. या सर्वांचे विरेंद्र मराठा यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.
स्मृतिस्तंभाला अभिवादन केल्यानंतर विरेंद्र मराठा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पानिपतची भूमी ही शौर्याची, त्यागाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेची आहे. ही किर्ती फक्त भारतापूरतीच मर्यादीत न राहता जगाच्या कानाकोपऱयाच गेली पाहिजे. याचबरोबर लढाईत हौतात्म्य पत्करलेल्या वीरांची आठवण म्हणून कालाआम येथे उभारलेल्या स्मृतीस्तंभाला आंतरराष्ट्रीय स्मारकसुद्धा बनवावे लागेल. त्यासाठी सर्वात आधी स्मृतिस्तंभाची जागा विस्तारीत करावी लागेल. समस्त मराठा बांधवांनी पुढाकार घेतला तर आंतरराष्ट्रीय स्मारक होणे शक्य आहे असेही ते म्हणाले.
मंचचे राज्य संघटक मिलिंद पाटील यांनी मनोगत व्यक्त पेले. लढाईनिमित्ताने हरियाणाशी मराठा बांधवांची जुळलेली नाळ कधी तुटू दिली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी हरियाणा येथील मंचचे कार्यवाह जयपाल चव्हाण, सचिव जोगिंदर धुमणे, संपर्क प्रमुख राजवीर चोपडे (खंडरा गाव), बस्ताडा गावचे सुरेंद्र घडणे, मुख्यराज्य संघटक मिलिंद पाटील, दिलीप सासने, सागर शेटे, युवा संघटक प्रांजल लोखंडे (नागपूर), ठाणे जिल्हा मुख्य संघटक संजय जाधव, नाशिकचे मुख्य संघटक राकेश हिरे, गोव्याचे मुख्य संघटक राजाराम पाटील आदी उपस्थित होते.