प्रतिनिधी / कोल्हापूर
मळलेले कपडे, अंगाला दुर्गंध अशा अवस्थेतील तो दररोज नागरिकांच्या दारात येतो. तिन चाकी ढकल गाडी द्वारे कचरा गोळा करतो, दुर्गंधीचे हलके काम करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला पाहताच आपल्यासारखे नाकं मुरडतात, मात्र शहराच्या, परिसराच्या सफाईचा उचललेला वसा तो गेली २० वर्ष अखंडीत चालवतो आहे. अशा या कर्मचाऱ्याची कोरोना संसर्गादरम्यानही सेवा सुरु आहे. पापाची तिकटी येथील लक्ष्मी गल्लीत राहणाऱ्या नागरिकांनी त्याची ही सेवा सार्थकी लावली. नागरिकांनी त्यांना मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि नोटांची माळ गळ्यात घालून आरोग्य सेवक कांबळे यांचे औक्षण केले. भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी केलेल्या ह्नद्य सत्काराने दिलीप कांबळे यांचे डोळे पाणावले.
कोरोना या महामारीचे संकट जगावर कोसळले आहे. जगभरात भितीचे सावट असल्यामुळे सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे. कोल्हापुरात संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. पोलीस दलासह, डॉक्टर, परिचारीका, पत्रकार, सफाई कर्मचारी आपली सेवा इमाने इतबारे पार पाडीत आहेत. यामध्ये सफाई कामगार हा घटका अगदी पहाटेपासून नागरिकांच्या आरोग्यासाठी परिसराच्या स्वच्छतेसाठी कार्यरत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ३२ बिंदू चौक या प्रभागामध्ये पापाची तिकटी परिसरात कार्यरत असणारे दिलीप बापू कांबळे (वय – ५५, रा. टिंबर मार्केट, आंबेडकरनगर) हे गेली २० वर्ष महापालीकेच्या आरोग्य विभागामध्ये हंगामी कामगार म्हणून कार्यरत आहेत.
या प्रभागामध्ये गेली १० वर्ष ते घंटा गाडीवर कचरा गोळा करण्याचे काम करतात. पहाटेपासूनच ते नागरिकांच्या सेवेत असतात. गल्लोगल्ली, नागरिकांच्या दारोदारी जावून ते कचरा गोळा करतात. हंगामी कामगाराला जेवढे दिवस भरतील तेवढाच पगार पदरात पडतो. पण आजतागायत या कर्मचाऱ्याने कोणाकडे काही मागण्यासाठी हात पुढे केला नाही. कोरोनाच्या साथीमध्येही तो प्रामाणिक सेवा बजावत असल्याने मंगळवारी लक्ष्मी गल्ली येथील अमर पावसकर, महेश कांबळे, विशाल पाटील, अमर कोठावळे, रमेश कांबळे या युवकांनी स्ववर्गणी जमविली. सफाई कामगार कांबळे मामाच्या सत्काराकरिता कोणी फेटा, कुणी शाल दिली, गणेश कांबळे याने स्वतः हारच बनविला.
गल्लीतील नागरिकांना एकत्र करून दिलीप कांबळे यांचा मानाचा फेटा बांधून, शाल श्रीफळ अर्पण करित, गळ्यात पुष्पहार व नोटांचा हार घालण्यात आला. बालिकांनी कांबळे मामाचे औक्षण केलं. यानंतर त्यांच्या सोबत नागरिकांनी फोटोही खेचले. कच-याने भरलेला गाडा नगरसेवक ईश्वर परमार, सागर रेडेकर यांनी खेचत नेला.नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात कांबळे मामांच्या सेवेला दाद दिली. यावेळी दिलीप पठाडे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.