वानुआतू देशात हैराण करणारी प्रथा
एक अनोखी आणि हैराण करणारी विचित्र प्रथा ऑस्ट्रेलियानजीकच्या एका छोटय़ाशा बेटवजा देश वानुआतूमध्ये आहे. येथे लोक अत्यंत उंच जागेवरून लोक उडी घेतात. टीव्हीवर किंवा प्रत्यक्षात बंजी जम्पिंग ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचा अनुभव घेतला असेल तर भीती नक्कीच वाटली असणार आहे. या क्रीडाप्रकारत माणसाचे पाय किंवा कंबरेला मोठे दोरखंड बांधले जातात आणि उंचीवरून ढकलून दिल sजाते. दोरखंडाच्या मदतीने ते हवेत लटकलेले राहतात. परंतु वानुआतू देशात नांगो नावाची एक प्रथा असून यात लोक पायांना वेली बांधून हवेत लटकतात.
लाकडाचा उंच टॉवर
ही प्रथा कित्येक वर्षांपासुन सुरू असून यात पुरुष स्वतःच्या पायांमध्ये वेली बांधतात आणि विशेष प्रकारच्या डाइव्ह करणाऱया प्लॅटफॉर्मवरून उडी घेतात. याची उंची 66-99 फुटांची असते. हा प्लॅटफॉर्म एकप्रकारे लाकडाचा टॉवर असतो. उत्सवाच्या स्वरुपात साजऱया होणाऱया या प्रथेला पेंटेकोस्ट आयलँडमध्ये एप्रिल-जूनदरम्यान पार पाडले जाते. प्रथेचे पालन केल्याने उडी घेणाऱया व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते आणि तो पावसाळय़ाला चांगल्याप्रकारे तोंड देऊ शकतो असे मानले जाते. तसेच ही प्रथा पौरुषत्वाशीही जोडली जाते.
का पाळली जाते प्रथा?
अनेक वर्षांपासून तेथे एक महिला राहत होती, जी स्वतःच्या पतीच्या उग्र स्वभावामुळे त्रस्त होती. पतीवर नाराज होत महिला जंगलात पळाली असता पती तिचा पाठलाग करू लागला. हे पाहून महिला एक उंच झाडावर चढली. संतप्त पतीनेही झाडावर चढण्यास सुरुवात केल्यावर महिलेने जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या पायांना वेली बांधून झाडावरून उडी घेतली. पतीने हे दृश्य पाहिल्यावर त्यानेही उडी घेतली पण, त्याने खबरदारी घेतली नव्हती. महिलेचा जीव वाचल्यावर या बेटावरील महिला ही प्रथा पार पाडू लागल्या. परंतु काळासोबत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना धोक्यामुळे असे करण्यापासून रोखले आणि जुनी प्रथा पुढे नेण्यासाठी पुरुष उंचावरून उडी घेऊ लागले.