अधिकाऱयांविरोधात तक्रार दाखल करण्याचा आमदार रुपाली नाईक यांचा इशारा
प्रतिनिधी / कारवार
येथील कारवार वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये (किम्स) निर्माण करण्यात येणाऱया नवीन रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभापूर्वीच रुग्णालय उभारण्याचे काम सुरू करून सर्व शिष्टाचारांना तिलांजली दिलेल्या अधिकाऱयांच्या विरोधात नाराजी व्यक्त करून अशा अधिकाऱयांच्या विरोधात रितसर तक्रार दाखल करण्याचा इशारा आमदार रुपाली नाईक यांनी दिला आहे.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, येथील किम्सच्या आवारात अद्ययावत 450 बेड्स सामर्थ्याचे रुग्णालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी 160 कोटी रुपये मंजूर केले आहेत. नियोजित रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाचे आमंत्रण मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना यापूर्वीच देण्यात आले आहे. येडियुराप्पा यांनी आमंत्रण स्वीकारून पायाभरणी समारंभाला हजर राहण्याचे ठोस आश्वासन आमदार नाईक यांना दिले आहे. पायाभरणी समारंभाची तारीख निश्चितपणे होणे तेवढे बाकी आहे. ही सर्व माहिती असूनही किम्सच्या अधिकाऱयांनी आणि संचालकांनी घाई करून रुग्णालय निर्मितीच्या कार्याला सुरुवात केली आहे. असे करून संबंधितांनी सरकारी शिष्टाचाराला तिलांजली दिली आहे. तसेच संबंधीतांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अगौरव दाखविला आहे. रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या मंजुरीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे.
आपण मतदारसंघात असूनही किमान सौजन्यासाठी तरी अधिकाऱयांनी आणि संचालकांनी कामाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती न देता रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले आहे, याबद्दल आक्रोश व्यक्त करून आमदार रुपाली नाईक यांनी पुढे असे म्हटले की, अधिकाऱयांच्या या निर्णयाच्या पाठीमागे कोणत्या शक्ती दडल्या आहेत याचा शोध लावण्याची गरज आहे.
शिष्टाचाराचे उल्लंघन
येथे लोकशाही नांदत असल्याने सरकार, मुख्यमंत्री, आमदार, लोकप्रतिनिधींना काळोखात ठेऊन शिष्टाचाराचे उल्लंघन करून घेतलेले निर्णय खपवून घेतले जाणार नाहीत. कारण येथे अधिकारशाही नाही आणि म्हणूनच सरकारी शिष्टाचाराचे उल्लंघन करून रुग्णालयाचे काम सुरू केलेल्या अधिकाऱयांच्या आणि किम्सच्या संचालकांच्या विरोधात सरकारकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा आमदार नाईक यांनी दिला आहे.
घाई…!
450 बेड्स सामर्थ्याचे रुग्णालय उभारणार
मुख्यमंत्र्यांकडून 160 कोटी रुपये निधी मंजूर
घाई करून रुग्णालय निर्मितीच्या कामाला सुरुवात